*देवळाली नगरपालिकेच्या कोविड सेंटर इमारती मधील चोरीचा तपास तात्काळ व योग्य दिशेने व्हावा* *प्रहार चे आप्पासाहेब ढुस यांचे पोलिसांना निवेदन*

*देवळाली नगरपालिकेच्या कोविड सेंटर इमारती मधील चोरीचा तपास तात्काळ व योग्य दिशेने व्हावा*  *प्रहार चे आप्पासाहेब ढुस यांचे पोलिसांना निवेदन*

देवळाली प्रवरा - दि. ११ एप्रिल 

देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या कोविड सेंटर इमारती मधील चोरी अंत्यत गंभीर असल्याचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांना दिले.  

     या निवेदनात ढुस यांनी म्हंटले आहे की, देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या कोविड सेंटर इमारतीमध्ये झालेल्या चोरी संदर्भात पोलीस ठाण्यातून प्राप्त झालेले कागदपत्रे व वर्तमानपत्रातील या विषया संदर्भात आलेल्या बातम्यांचे अवलोकन केले असता देवळाली प्रवरा कोविड सेंटर मध्ये सुमारे २.२५ लाख रुपयांचे साहित्य चोरी झालेचे दिसून येते. परंतु प्रत्यक्षात दिलेल्या फिर्यादी व्यतिरिक्त येथे काही संगणक व इतरही काही महत्वाच्या बाबी चोरीस गेल्याची जनमानसात कुजबुज आहे. 

     या कोविड सेंटर संदर्भात काही रुग्णांकडून वाढीव बिल आकारणी बाबत आम्ही काही तक्रारी तसेच न्यायालयीन मार्गाने जात संबंधित रुग्णांना न्याय देणे बाबत आग्रही आहोत. त्या अनुषंगाने मे. न्यायालयाने तसेच मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतल्याने उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी अध्यक्ष असलेल्या समितीद्वारे या कोविड सेंटरची चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या सुनावणीच्या दरम्यान सदर कोविड सेंटर चालकांकडून कोविड सेंटरमध्ये असलेल्या सोई सुविधा तसेच संगणकीय बिलाबाबत समितीने माहिती मागवली होती. 

      परंतु आता ही चोरी झाल्यामुळे कदाचित योग्य वस्तुस्थिती समितीसमोर न जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना न्याय मिळवून देण्याच्या आमच्या प्रयत्नांना एकप्रकारे अडचण निर्माण झाली असे वाटते. 

      तरी चोरीला गेलेल्या सर्व मुद्देमालासाहित आरोपींना आपण तात्काळ अटक करून त्यांचा चोरीचा नेमका हेतू काय होता याचा उलगडा करण्याची विनंती निवेदनात शेवटी ढुस यांनी केली आहे.