तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करावी.

तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करावी.

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी// संभाजी शिंदे

ग्राम विकासाचा मूलभूत पाया असलेली यंत्रणा निष्क्रिय होत चाललेली आहे.ग्रामविकासासाठी शिक्षण आरोग्य व कृषी सुविधा ह्या महत्त्वपूर्ण असतात .ग्राम विकासाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने शिक्षक , तलाठी , ग्रामसेवक ,कृषी सहाय्यक व आरोग्य कर्मचारी हे मूलभूत घटक असून या घटकांचे कर्तव्य कमी पडताना दिसून येत असून त्यामुळे ग्रामीण विकास पाहिजे तितका झपाट्याने होताना दिसून येत नाही . एवढी मोठी सरकारी यंत्रणा ग्राम स्तरावर काम करत असतांना ग्रामस्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे दिसून येत आहे . यातील शासकिय कर्मचारी शासनाचीच फसवणूक करत आले आहे त्यामुळे यांच्याकडून ग्रामस्थांना न्याय मिळेलच याची शाश्वती नाही . ग्रामस्थांच्या सोयीसाठी या अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे . ग्रामपंचायतचे मुख्यालयी राहत असल्याचे ठराव पाठवून शासनाची फसवणूक करत असलेले अधिकारी ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे देऊन काम टाळतात . ग्रामस्तरावर ही शासकीय यंत्रणा मजबूत करण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी महत्वाची ठरेल परंतू हे शासकीय कर्मचारी इतके चतूर आहेत की बऱ्याच ठिकाणी बायोमेट्रिक हजेरीचे मशिनच बंद करून टाकले आहे .

     

          अनेक गावात अशी परिस्थिती झालेली आहे की तलाठी व ग्रामसेवक यांचे दर्शन दुर्लभ झालेले आहे.त्यामुळे नागरिकांचे अनेक विकास कामे प्रलंबित राहतात.तलाठ्याचे काम संपूर्ण अधिकाराने कोतवालच करताना दिसून येत आहे .तर ग्रामसेवकाचे काम शिपाईच बघत आहे.त्यामुळे शासनाचा फुकटचा पगार घेऊन फिरणारे व मीटिंगच्या नावाखाली कायमच ऑफिसला गैरहजर राहणारे कर्मचारी ग्राम विकास करणार का ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे .

        

          ग्राम विकासाचा हा मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी गरजेची आहे जेणेकरून सदरचे शासकीय कर्मचारी नियमित उपस्थित राहतील व ग्रामविकास होईल .   गैरहजर राहणाऱ्या या शासकीय कर्मचाऱ्यांवर बायोमेट्रिक हजेरीद्वारे योग्य पद्धतीने नियंत्रण मिळवता येईल ही गोष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर सदरचा नियम काटेकोरपणे लागू करावा अशी मागणी नेवासा तालुक्यातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.