*महात्मा फुले कृषी विद्यापीठात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.*
*राहुरी विद्यापीठ, दि. 3 जून, 2026*
आपल्या सर्वांची जीवनशैली सध्या खूप धकाधकीची झालेली आहे. आपण आपल्या आरोग्याकडे जेवढे लक्ष देणे अपेक्षित आहे तेवढे देत नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. अशा परिस्थितीमध्ये नियमितपणे आरोग्य तपासण्या करून घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये विद्यापीठाचा दवाखाना व अहिल्यानगर येथील साईदीप हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, श्रीमती सुरुची खर्चे, साईदीप हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॉ. अजय झोरे, स्त्रीरोगतज्ञ डॉ. झोरे मॅडम, त्वचारोग तज्ञ डॉ. प्रणाली राठोड, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय पाटील, उपकुलसचिव (प्रशासन) श्रीमती मनीषा निकम व विद्यापीठाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली हिले उपस्थित होते.
यावेळी डॉ. अजय झोरे आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ उपस्थित असलेल्या सर्वांनी घ्यावा. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपण वरचेवर तपासणी करणे महत्त्वाचे आहे. या आरोग्य शिबिरामध्ये ईसीजी, ब्लड शुगर या हृदयासंबंधीच्या महत्त्वाच्या असणाऱ्या चाचण्या, त्वचारोग तसेच स्त्रियांचे आजार याविषयी तपासण्या करून मार्गदर्शन करण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये 500 हून अधिक अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी तपासण्या करून घेतल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वैशाली हिले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. विलास आवारी यांनी मानले.








