*महात्मा फुले कृषि विद्यापीठात कांदा बियाणे विक्री सुरू.*
*राहुरी विद्यापीठ, दि. 3 जून, 2026*
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे व संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. नरेंद्र काशीद यांच्या देखरेखीखाली कृषि विद्यापीठाच्या बियाणे विक्री केंद्रात फुले समर्थ या वाणाचे कांदा बियाण्याची विक्री आज दि. 3 जून, 2026 रोजी सुरू करण्यात आली. यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात कांदा बियाणे विक्रीची सुरुवात कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या शुभहस्ते करजगाव (ता. नेवासा) येथील श्रीमती सुनिता फुलसौंदर व बेलापूर येथील शेतकरी श्री. मारुतराव राशिनकर यांना फुले समर्थ बियाणे देऊन करण्यात आली. बियाणे विक्रीचा शुभारंभ करतांना कुलगुुरु डॉ. विलास खर्चे यांनी शेतकर्यांशी संवाद साधला असता विद्यापीठाच्या फुले समर्थ वाणाला त्याच्या आकर्षक लाल रंगामुळे बाजारामध्ये इतर कांदा वाणापेक्षा जास्त बाजारभाव मिळत असल्याबद्दल सांगितले. कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी उपस्थित शेतकर्यांना विद्यापीठ विकसीत तंत्रज्ञान जसे कांदा लागवडीकरीता सुपीक, मध्यम ते भारी जमिनीची निवड करणे, पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बेन्डॅझीम (बाविस्टीन 2 ग्रॅम प्रति किलो) बिजप्रक्रिया करणे तसेच खरीप कांद्याची लागवड जून पहिला पंधरवाडा व रांगडा कांदा जुलै दुसरा पंधरवाडा ते ऑगस्ट पहिला पंधरवाडा पेरणी करण्याबाबत आवाहन केले. कांदा लागवडीबाबत विद्यापीठाने शिफारस केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती क्यु.आर.कोडच्या स्वरुपात बियाणे विक्री पिशवीत दिलेले असून त्याचा शेतकरी बांधवांनी अवलंब करावा असे आवाहन केले. कांदा बियाणे विक्रीच्या सुलभतेसाठी विद्यापीठाने यावर्षी कांदा उत्पादक असणार्या नाशिक जिल्ह्यातील कृषि संशोधन केंद्र, निफाड, कांदा, लसून व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत, कृषि महाविद्यालय, मालेगाव, पुणे, हाळगांव, यासह कृषि विज्ञान केंद्र, धुळे व कृषि संशोधन केंद्र, चास या ठिकाणी फुले समर्थ वाणाचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
बियाणे विक्रीच्या पहिल्याच दिवशी बियाण्यास शेतकर्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून आला. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी. टी. पाटील, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेश दोडके, कुलगुरुंचे तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल, भाजीपाला बिजोत्पादन अधिकारी डॉ. डी.बी. क्षीरसागर, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, बियाणे विभागाचे बिजोत्पादन अधिकारी डॉ. कैलास भोईटे, प्रक्षेत्र अधिक्षक प्रा. बी.टी. शेटे, सहाय्यक बिजोत्पादन अधिकारी डॉ. कैलास गागरे, तांत्रिक अधिकारी डॉ. राजेंद्र माने, सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्ष शेटे व बियाणे विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. डॉ. नरेंद्र काशिद यांनी या वर्षीची बियाणे विक्री प्रक्रिया सुलभ होणे कामी ऑनलाईन व ऑफलाइन पध्दतीचा वापर केला असून महिलांसाठी स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण केली. त्याचप्रमाणे बियाणे विकत घेण्यासाठी येणार्या शेतकरी बंधू भगिणींकरीता त्यांची गैरसोय होवू नये म्हणून मंडप, ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे नियोजन व प्रसाधनगृहाच्या फलकासह विशेष काळजी घेण्यात आली. कांदा बियाण्याची विक्री व्यवस्था ही कांदा बियाणे शिल्लक असेपर्यंत चालू राहणार आहे.








