राहुरी तालुक्यात पुरवठा विभागाची धडक कारवाई; ३५ हॉटेलची तपासणी, ११ घरगुती गॅस सिलिंडर जप्त**
**राहुरी तालुक्यात पुरवठा विभागाची धडक कारवाई; ३५ हॉटेलची तपासणी, ११ घरगुती गॅस सिलिंडर जप्त**

राहुरी ता प्रती - देवेंद्र शिंदे
दिनांक १४ मार्च रोजी माननीय जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये जिल्हा पुरवठा विभागाने राहुरी तालुक्यासह राहुरी शहरातील हॉटेल व्यवसायिकांवर धडक तपासणी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान शहरातील तील विविध भागातील एकूण ३५ हॉटेलची तपासणी करण्यात आली असून काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे उघडकीस आले. तपासणीदरम्यान व्यावसायिक वापरासाठी असलेल्या गॅस सिलिंडरऐवजी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने तात्काळ कारवाई करत एकूण ११ घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले.
सरकारकडून घरगुती वापरासाठी अनुदानित दरात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरचा वापर केवळ घरगुती गरजांसाठी करण्याचा नियम आहे. मात्र काही हॉटेल चालकांकडून खर्च वाचवण्यासाठी घरगुती सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत माननीय जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब यांच्या आदेशान्वये जिल्हा पुरवठा विभागाने राहुरी तालुक्यात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली.
या मोहिमेत विविध भागातील हॉटेल, खानावळी व खाद्य व्यवसायिकांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान काही ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर सुरू असल्याचे आढळून आल्याने संबंधित ठिकाणांहून घरगुती गॅस ११ सिलिंडर जप्त करण्यात आले. त्याचबरोबर जप्त केलेल्या गॅस टाक्या वापरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई होणार असल्याचे समजते.तसेच संबंधित हॉटेल चालकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पुढील काळात नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या संयुक्त पथकात अन्नधान्य वितरण अधिकारी सपना भोवते मॅडम अहिल्यानगर शहर, पुरवठा निरीक्षण अधिकारी शिवराज पवार साहेब अहिल्यानगर ग्रामीण, पुरवठा निरीक्षण अधिकारी सुदर्शन केदार साहेब राहुरी.तसेच पुरवठा निरीक्षक ज्योती सगभोर मॅडम राहुरी. आणि राहुरी पोलीस स्टेशन चे हेडकॉन्स्टेबल संदीप ठाणगे यांचा समावेश होता.
दरम्यान, जिल्हा पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक आस्थापनांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केल्यास अशा प्रकारच्या धडक कारवाया पुढेही सुरू राहतील,असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.








