भरड धान्याच्या जनजागृतीसाठी भरडधान्य मेळावे भरावे - पद्मश्री राहीबाई पोपेरे

*प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त अन्न असावं*
*भरड धान्याच्या जनजागृतीसाठी भरडधान्य मेळावे भरावे*
*-पद्मश्री राहीबाई पोपेरे*
माती चांगली तर अन्न चांगले आणि अन्न चांगले तर आपले आरोग्य चांगले. माती चांगली ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खत व विषारी औषध वापरू नये. या चांगल्या मातीमध्ये देशी बियाणे लावा व आपली पुढची पिढी सुदृढ करा. देशी वाण व मातीचे संवर्धन केले तरच पुढची पिढी आपली निरोगी व सुदृढ राहील. आपण जे चांगले होते ते हरवून बसलो. या चायनीज व हायब्रीड वानांमध्ये काही दम नाही. ज्यात चमक आहे त्यात धमक नाही. आपल्या भरड धान्यामध्ये खूप ताकद आहे. इथून पुढे आपण भरड धान्य मेळावे भरावा. प्रत्येकाच्या घरात देशी वाणाची परसबाग हवी जेणेकरून आपल्या ताटातील भाजी विषमुक्त असेल असे प्रतिपादन पद्मश्री श्रीमती राहीबाई पोपेरे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय पुणे येथे सुरू असलेल्या फुले कृषि २०२५ व सावित्री जत्रा या प्रदर्शनात तिसऱ्या दिवशी महिला दिनानिमित्त पद्मश्री श्रीमती राहीबाई पोपेरे महिला, शेतकरी, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधताना बोलत होत्या. याप्रसंगी कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. महानंद माने, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू आमोलिक, गणेश खिंडचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. विष्णू गरांडे, तसेच डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. अविनाश गोसावी, डॉ. सुहास उपाध्ये उपस्थित होते. याप्रसंगी पद्मश्री श्रीमती रहीबाई पोपेरे यांचा सत्कार सौ. विदुला माने आणि सौ. मंदाकिनी पाटील यांनी केला. याप्रसंगी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते श्रीमती सुभद्रा जयवंत कुरकुटे यांनी लिहिलेले जात्यावरच्या ओव्या या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.
या प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी तांत्रिक सत्रामध्ये नाबार्डचे वरिष्ठ व्यवसाय विकास व्यवस्थापक महेश भोयर यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यासाठी कर्जपुरवठा आणि योजना, प्रजापिता ईश्वरी विश्वविद्यालयाच्या बी के शारदा बहणजी यांनी योगिक शेती व शेतीमधील महिलांचा सहभाग, तळेगाव दाभाडे येथील प्रगतशील शेतकरी महिला सौ. शुभांगी दळवी यांनी फुल शेतीमधील व्यवसायाच्या संधी, पुणे येथील राष्ट्रीय बीजोत्पादन संस्थेचे विभागीय व्यवस्थापक श्री एस. सी. चिमूरकर यांनी बीज उत्पादनाचा परवाना व वितरण प्रणाली यावर शेतकरी विद्यार्थी यांना सविस्तर मार्गदर्शन केले.या तांत्रिक सत्रांचे प्रास्ताविक डॉ. विष्णू गरांडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुहास उपाध्ये तर आभार डॉ. प्रमोद चौधरी यांनी मानले.