पात्रता व नियुक्ती नसातानाही कारभार हाकणाऱ्या ग्रामसेवकांच्या ' त्या ' प्रतापांची चौकशी सुरू . रावडेंच्या तक्रारीनंतर जि.प. प्रशासनाने दिले चौकशीचे आदेश .

पात्रता व नियुक्ती नसातानाही कारभार हाकणाऱ्या ग्रामसेवकांच्या ' त्या ' प्रतापांची चौकशी सुरू . रावडेंच्या तक्रारीनंतर जि.प. प्रशासनाने दिले चौकशीचे आदेश .

*ग्रामसेवकांच्या 'त्या' प्रतापांची चौकशी सुरु*

पात्रता व नियुक्ती नसतानाही केला कारभार : सोपान रावडेंच्या तक्रारी नंतर जि.प. प्रशासनाने दिले चौकशीचे आदेश .

                नेवासा : - पात्रता व नियुक्ती नसतानाही ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या पदाचे काम ग्रामसेवक बेकायदेशीरपणे वर्षानुवर्षे बिनदिक्कतपणे पाहात असल्याच्या माहिती अधिकार कार्यकर्ते सोपान रावडे यांच्या तक्रारीची नगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे आदेश दिल्याने पंचायत राज वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 

 

                     याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, नेवासा तालुक्यातील सोनई, घोगरगांव, बेलपिंपळगांव, नेवासा बुद्रुक, मुकींदपूर, कुकाणा, चांदा आदी ग्रामविकास अधिकारी पदाचा दर्जा असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींचा कारभार ग्रामसेवक दर्जाचे अधिकारी त्यांची पात्रता व त्या ठिकाणी नियुक्ती नसतानाही गेली वर्षानुवर्षे बिनदिक्कत व बेकायदेशीरपणे पाहात असल्याची बाब नुकतीच उघडकीस आली. जिल्हा परिषदेचे गाव पातळीवरील कर्मचारी नियमानुसार मुख्यालयी न राहता शहराच्या ठिकाणी वास्तव्य करुन शासन व जनतेची फसवणूक करत असल्याप्रकरणी गेल्या तीन-चार वर्षांपासून तक्रार अर्ज, पाठपुरावा, उपोषण-आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोपान रावडे यांनी ग्रामसेवकांच्या नव्यानेच उघडकीस आलेल्या प्रतापांच्या संबंधित बातम्यांची कात्रणे जोडून याप्रकरणीही चौकशी व कारवाईची मागणी तक्रार अर्जाद्वारे नगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. या तक्रारीत रावडे यांनी पात्रता व नियुक्ती नसतानाही ग्रामविकास अधिकारी पदाचा कारभार करत संबंधितांनी कोट्यावधी रुपयांचा निधी बेकायदेशीरपणे खर्च केलेला असल्याने या संपूर्ण रकमेची त्यांच्याकडून वसूली करुन त्यांच्यासह त्यांना सदर बेकायदेशीर कृत्य करण्यास मोकळीक देणाऱ्या तसेच त्याकडे सोयिस्कररित्या डोळेझाक करणाऱ्या नेवासा पंचायत समितीच्या वरीष्ठांचीही चौकशी करुन या सर्वांवर नियमानुसार शासकीय सेवेतून बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

 

                नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी रावडे यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तातडीने याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याने संबंधितांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. सरळमार्गी तसेच नकोशा वाटणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना त्यांची नियुक्ती असतानाही राजकीय तसेच प्रशासकीय पातळीवरुन दादागिरी करत कामकाज पाहण्यास मज्जाव करुन पात्रता व नियुक्ती नसलेल्या ग्रामसेवकांच्या हाती बेकायदेशीरपणे कारभार सोपविणाऱ्या नेवासा पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांसह एका विस्तार अधिकाऱ्याच्या अडचणीत यामुळे वाढ होण्याची चर्चा पंचायत राज वर्तुळात घडताना दिसते.