लोहगाव येथील गाईंच्या विषबाधा प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी-भारतीय पत्रकार संघटन व मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान यांच्यावतीने मागणी.
नेवासा तालुक्यातील लोहगाव येथील शेतकरी रोहिदास जनार्दन ढेरे यांच्यावर संकटाचा कहर तुटून पडला आहे .या शेतकऱ्याच्या गोठ्यातील २९ जनावरांपैकी १९ जनावरांचा विषबाधेने मृत्यू झाला आहे .रक्ताचे पाणी करून पोटच्या लेकरांप्रमाणे जीव लावलेली जनावरे डोळ्यासमोर मरताना पाहून रोहिदास ढेरे व त्यांच्या पत्नी यांना मोठे दुःख झाले आहे .या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रसारमाध्यमांनी याची दखल घेतली व संपूर्ण महाराष्ट्रभर या कुटुंबाची व्यथा मांडली होती . या शेतकऱ्याला व त्यांच्या कुटूंबाला या दुःखातून सावरण्यासाठी शासनाकडून भरीव मदत मिळणे गरजेचे होते. अनेक दिग्गजांनी घटनास्थळी भेटी देऊन केवळ पोकळ आश्वासन देण्याचे काम केल्याचेच चित्र दिसत आहे .
अनेक दिग्गज डॉक्टरांनी या गाईंना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले असून त्यांच्याही प्रयत्नांना यश आलेले दिसत नाही तसेच या गाई नेमक्या कोणत्या विष बाधेने मृत्युमुखी पडत आहे याचेही कारण स्पष्ट झालेले दिसत नाही .हा सर्व प्रकार पाहता नक्की विषबाधा झाली की जनावरांचा घात पाताने मृत्यू झाला हे स्पष्ट होणे गरजेचे आहे .
नेवासा तालुक्यातील भारतीय पत्रकार संघटनेचे अहमदनगर उपजिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे,मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संपर्कप्रमुख सचिन चांदघोडे ,अजय मोहिते, शेखर दरंदले यांनी या प्रकरणाची दखल घेऊन सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी म्हणून निवेदन देण्यात आले आहे .