प्रहारच्या वतीने श्रीरामपूर नगरपालिकेला अल्टीमेट.
श्रीरामपूर:- श्रीरामपूर शहरातील स्थानिक नागरिकांसह सर्वसामान्य नागरीकांना दिवसेंदिवस दैनंदिन बाबींसाठी अनेक अडचणींचा, असुविधांचा सामना करावा लागत आहे. श्रीरामपूर शहरातील विविध अडचणीबाबत प्रहार जनशक्ती पक्षाने नगरपालिकेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. मात्र नगरपालिकेकडून अनेकवेळा सदरील मागण्याना बगल देण्यात येत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीतदादा पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब ढूस व विधानसभा उपाध्यक्ष लक्ष्मण खडके पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहर प्रमुख सोमनाथ गर्जे यांनी श्रीरामपूर नगर पालिकेला प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा दिला.
त्यानंतर दि.२९ ऑगस्ट २०२३ रोजी श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सर्व विभागातील प्रमुखांसह बैठकीचे आयोजन करून सविस्तर चर्चा केली. सदरील बैठकीमध्ये श्रीरामपूर शहरातील अतिशय मुख्य बाबींवर चर्चा करण्यात आली. यामध्ये सर्वप्रथम श्रीरामपूर शहरवासीयांना स्वच्छ व निरोगी पिण्याचे पाणी मिळावे म्हणून वरिष्ठ पातळीवर बंदिस्त पाईपलाईनने पाणी मिळण्यासाठी तात्काळ मागणी प्रस्ताव करण्याचे सुचविण्यात आले. तसेच आजमितीला स्थानिक नागरिकांना पिण्यासाठी मिळणारे पाणी कॅनॉलद्वारे कसे येते ? याबाबत प्रत्यक्ष कॅनॉलची पाहणी करावी. कारण पिण्यासाठी येणारे पाण्याचे कॅनॉल अतिशय दूषित, दुर्गंधीयुक्त व अस्वच्छ असून काही भागात कॅनॉलमध्ये परिसरातील नागरिक शौचास बसतात. जनावरांचे मलमूत्र सोडले जाते, मेलेली जनावरे, कुत्रे, आदी पशुपक्षी टाकले जातात. परिसरातील नागरिक, दुकानदार घरातील व दुकानातील कचरा या कॅनॉलमध्ये टाकतात. त्यामुळे संपूर्ण शहरवासींच्या आरोग्य संकटात असल्याने सदरील कॅनॉलची तात्काळ स्वच्छता करून त्यावर कायमस्वरूपी उपयोजना करण्याची अग्रमागणी करण्यात आली.
श्रीरामपूर शहरात नागरिकांसाठी पुरेसे स्वच्छतागृह नसल्याने तसेच सद्यस्थितीत असलेल्या स्वच्छतागृहांची स्वच्छता व्यवस्थित होत नसल्याने परिसरातील वातावरण दुर्गंधीयुक्त होत आहे. परीसरातील दुकानदार, रहिवासी, वाटसरू यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अपूर्ण व असुविधायुक्त स्वच्छतागृहे नसल्याने जेष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शहरात नव्याने स्वच्छतागृहे उभारण्यात यावेत. व सद्यस्थितीत असलेल्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबत संबधितांना कडक सूचना करण्याबाबत मागणी केली.
त्याचप्रमाणे शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च करून मिनी स्टेडियम इमारतींचे बांधकाम केले. मात्र बी. बिल्डिंगची सध्यपरिस्थिती पाहता शासनाचा खर्च पूर्णतः वाया गेल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात येत असल्याची खंत यावेळी विधानसभा उपाध्यक्ष लक्ष्मण खडके पाटील यांनी व्यक्त केली. सदरील बिल्डींग मधील पार्किंग झोन रद्द करून त्याठिकाणी गाळ्यांचे बांधकाम करावे व दुसऱ्या मजल्यावरील गाळ्यांची दुरुस्ती करून संपूर्ण इमारतीला संरक्षण मिळण्यासाठी हायमाक्स दिवा व सीसी टीव्ही बसविण्यात यावेत अशी मागणी केली. तसेच शहरातील विविध ठिकाणी, मुख्य रस्त्यांवर, शासकीय कार्यालयांच्या परिसरात मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरवीत असल्याने व एकत्रित होत असल्याने अपघात होत आहे. सर्वसामान्य नागरिक, अधिकारी आदींना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधितांना उचित तात्काळ आदेश निर्गमित व्हावे, असे यावेळी मुख्याधिकाऱ्यांना सांगण्यात आले. सध्या शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आढळून येत आहे. अनेक दुकानासमोर, सरकारी कार्यालयासमोर, बँकांसमोर, चौका - चौकामध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. त्यामुळे दिवसेंदिवस वादविवाद, अपघात, वाहन चोरी होत असून शहरांमध्ये येणारे प्रवासी, ग्राहक व सर्वसामान्य नागरिक हैराण झालेले आहेत. याबाबत नगर पालिकेने पोलीस प्रशासनाची व आर.टी.ओ. यांच्यासह संयुक्त कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील दैनंदिन स्वच्छता केली जाते मात्र अनेक गटारीवरील डास, बारीक किडे यामुळे प्रवाशासह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सदरील गटारीच्या कडेला टाकण्यात येत असलेली पावडर निकृष्ट दर्जाची असल्यामुळे डासांसह कोणत्याही किटकावर परिणाम आढळून येत नाही. यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. तसेच शहरात चारही बाजूने येणाऱ्या मुख्य रस्त्यांना योग्य अंतरावर गतिरोधक नसल्याने तसेच काही ठिकाणी आवश्यकते पेक्षा जास्त गतिरोधक असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे नुकतेच नेवासा रोड ओव्हर ब्रिजजवळ अनेक अपघात होऊन प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे याबाबत सबंधित विभागाला सूचना करण्यात याव्यात.
अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चा सकारात्मक झाली मात्र वरील सर्व विषायांकित मागण्या लोकहिताच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या असल्याने याबाबत साकोल्याने विचार होऊन तात्काळ कार्यवाही करावी. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगरपालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी प्रहार स्टाईलने व अनोख्या पद्धतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे कळविले आहे.
यावेळी प्रहार जनशक्तीचे विधानसभा उपाध्यक्ष लक्ष्मण खडके पाटील, शहर प्रमुख सोमनाथ गर्जे, मुख्याधिकारी गणेश शिंदे. बांधकाम विभागाचे राम सरगळ, अतिक्रम विभागाचे संजय शेळके, दिव्यांग विभागाचे अरुण लांडे, स्वच्छता विभागाचे संजय आरणे, पाणी पुरवठा विभागाचे मिलिंद देवकर,आधार दिव्यांग संघटनेचे शहर प्रमुख सुमित रहिले आदि कार्यकर्ते, नागरिक व अधिकारी, पत्रकार उपस्थित होते.