राहुरी बाजार समितीने खुला कांदा खरेदी करावा - आप्पासाहेब ढुस
दि. ३१ मे
श्रीरामपूर व राहत्याच्या धर्तीवर राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने खुला(लूज) कांदा खरेदी विक्री लिलाव सुरू करावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी राहुरी बाजार समितीचे प्रशासकीय अध्यक्ष तथा राहुरीचे सहा. निबंधक दिपक नागरगोजे साहेब यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकऱ्यांनी ट्रॉली, टेम्पोच्या माध्यमातून खुला कांदा बाजारात विक्री केल्यास शेतर्यांना येणारा रिकाम्या गोणीचा खर्च, मजुरी, हमाली इत्यादी सर्व खर्च सोसावा लागतो, राज्यात कांद्याचे भाव कमी झालेले आहेत, त्यातच हा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही. कांदा उत्पादन खर्चात कपात करायची असेल तर विक्री पद्धतही बदलावी लागणार आहे. त्यामुळे गोण्यांचा खर्च वाचला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
शेजारच्या श्रीरामपूर व राहता बाजार समितीने खुला कांदा खरेदी करणेबाबत घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खुला कांदा खरेदी विक्री व्यवहार तात्काळ सुरू करावेत असे निवेदनाचे शेवटी आप्पासाहेब ढुस यांनी म्हंटले आहे. या निवेदनाच्या प्रति प्रहार चे संस्थापक अध्यक्ष तथा राजमंत्री नामदार बच्चूभाऊ कडू तसेच अहमदनगर चे जिल्हाधिकारी, व प्रहारची जिल्हाध्यक्ष अभिजीतदादा पोटे यांना पाठविले असल्याचे ढुस यांनी सांगितले.
ढुस यांचे निवेदन स्वीकारताना प्रशासकीय अध्यक्ष दीपक नागरगोजे यांचेसह राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश डुकरे, उपसचिव जरे साहेब आदी उपस्थित होते.