राहुरीत खाजगी रक्ततपासणी लॅब वाल्याकडून गोरगरीब जनतेची लुट

राहुरीत खाजगी रक्ततपासणी लॅब वाल्याकडून गोरगरीब जनतेची लुट

*राहुरीत खाजगी रक्ततपासणी लॅबांचा उघड लुटीचा धंदा – गरीब रुग्णांची निर्लज्ज* *आर्थिक लूट; 15 दिवसांत कारवाई नाही तर उग्र जनआंदोलनाचा इशारा* 

राहुरी ता प्रती डॉ देवेंद्र शिंदे

राहुरी शहर व तालुक्यातील अनेक खाजगी रक्ततपासणी (पॅथॉलॉजी) लॅबमध्ये शासनमान्य दरपत्रक जाणीवपूर्वक न लावता सामान्य नागरिकांची सर्रास आर्थिक लूट, फसवणूक व मानसिक छळ सुरू असल्याचा गंभीर आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर काळा डाग लागला आहे.

भीम लहुजी पॅंथर सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत अशोक जगधने यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा 2 ते 5 पट जास्त अवाजवी शुल्क आकारून गरिब, शेतकरी, मजूर, महिला, वृद्ध व ग्रामीण रुग्णांची उघडपणे लूट केली जात आहे. दरपत्रक दर्शनी भागात लावणे कायद्याने बंधनकारक असतानाही बहुतांश लॅबमध्ये ते लावले जात नाही, जेणेकरून नागरिकांना दर विचारताच येऊ नयेत.

कोणी रुग्ण दर विचारल्यास त्याच्यावर उद्धटपणा, दमदाटी, अरेरावी, मानसिक दडपण आणि अपमानास्पद वर्तन केले जात असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. परिणामी अनेक गरीब रुग्ण कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून, औषधांवर खर्च कमी करून या लॅबवाल्यांची अवाजवी फी भरण्यास भाग पडत आहेत.

हा प्रकार Clinical Establishments Act 2010, ग्राहक संरक्षण अधिनियम 2019, महाराष्ट्र नर्सिंग होम अधिनियम तसेच भारतीय दंड संहिता कलम 420, 406 व 34 अंतर्गत थेट गुन्हेगारी स्वरूपाचा असून, ही केवळ निष्काळजीपणा नसून संघटित आर्थिक शोषण व आरोग्य व्यवस्थेतील संगनमताने चालवलेले लुटीचे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

विशेष तपासणी व ऑडिट ड्राइव्हची मागणी

राहुरी तालुक्यातील सर्व खाजगी पॅथॉलॉजी लॅबची तात्काळ विशेष तपासणी व आर्थिक ऑडिट ड्राइव्ह राबवावी, दोषी लॅबचे परवाने तात्काळ रद्द करून कामकाज बंद करावे, फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि नागरिकांकडून बेकायदेशीररीत्या उकळलेली रक्कम परत मिळवून द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

 *15 दिवसांत कारवाई नाही तर उग्र* *आंदोलन* 

जर 15 दिवसांच्या आत ठोस व कठोर कारवाई झाली नाही, तर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन, धरणे आंदोलन व आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा थेट इशारा देण्यात आला आहे. तसेच हे प्रकरण राज्य आरोग्य संचालक, आरोग्यमंत्री कार्यालय, लोकायुक्त, मानवाधिकार आयोग, ग्राहक न्यायालय व प्रसारमाध्यमांमार्फत राज्यभर उचलून धरले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 *हा* *लढा जनतेच्या हक्कांसाठी – चंद्रकांत* *जगधने* 

“हा लढा कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नसून, सामान्य जनतेच्या आरोग्य हक्कांसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि आरोग्य क्षेत्रातील लुटीविरोधात आरपारचा संघर्ष आहे. गरीब रुग्णांची लूट करणाऱ्यांना देवठणीवर आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही,” असा इशारा चंद्रकांत जगधने यांनी दिला आहे.

 *राहुरी प्रतिनिधी: चंद्रकांत जगधने*