अशोक‌’ च्या नविन प्रकल्पांचे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन भारत देश हा ऊर्जा आयात करणारा नव्हे, तर ऊर्जा निर्यात करणारा देश बनला पाहिजे: केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी.

अशोक‌’ च्या नविन  प्रकल्पांचे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन  भारत देश हा ऊर्जा आयात करणारा नव्हे, तर ऊर्जा निर्यात करणारा देश बनला पाहिजे: केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी.

श्रीरामपूर ( अशोकनगर )- भारत देश ऊर्जा आयात करणारा नाही तर ऊर्जा निर्यात करणारा देश बनला पाहिजे. भविष्यात इथेनॉलवरील वाहन निर्मिती विकसीत होणार असल्याने साखर उद्योगासाठी इथेनॉल निर्मिती वरदान ठरेल. पेट्रोल, डिझेल, गॅस आदी इंधन आयातीसाठी सुमारे १६ लाख कोटी देशाबाहेर जातात. इथेनॉल निर्मिती वाढविल्यास देशाची मोठी आर्थिक बचत होईल. केवळ साखर उत्पादनावर साखर कारखाना चालविणे जिकीरीचे बनले आहे. भविष्यात इथेनॉलचा इंधन म्हणून वापर वाढणार असल्याने इथेनॉल उत्पादन वाढविण्यावर साखर कारखान्यांनी भर दिल्यास कारखान्यांचे अर्थकारण सुधारेल. यातून ग्रामीण भागात परिवर्तन घडून शेतकरी समृद्ध व संपन्न होतील. “स्मार्ट शहराबरोबरच आता स्मार्ट व्हिलेजस” ची निर्मिती झाली पाहिजे. साखर कारखानदारी टिकली तरच ग्रामीण भाग व शेतकरी टिकेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांनी केले. अशोक कारखान्याच्या प्रतिदिन ६० हजार लिटर क्षमतेचा नविन अल्कोहोल प्रकल्प तसेच प्रतिदिन ६० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प आणि २२ टी.पी.एच. (टन प्रति तास) क्षमतेचा नविन इन्सीनरेशन बॉयलर आदींचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी यांचे हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सींग) करण्यात आले. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे होते. कार्यक्रमास आ.आशुतोष काळे, आ.सत्यजित तांबे, माजी आ.भाऊसाहेब कांबळे, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन सुभाष कोते, शिवसेनेचे अशोकराव थोरे, शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख सौ.राजश्रीताई होवाळ, अशोक कारखान्याचे संचालक मंडळाचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.       श्री.गडकरी पुढे म्हणाले की, भविष्यात इथेनॉलचा हवाई इंधन म्हणून वापर होणार असून विमाने, हेलिकॉप्टर आदी शेतकरी निर्मित इथेनॉलवर चालणार आहेत. यापुढे अनेक वाहन निर्मिती कंपन्या इथेनॉलवर आधारीत वाहन उत्पादन वाढविणार आहे. त्यामुळे इथेनॉलचे उत्पादन साखर कारखान्यांनी वाढविणे गरजेचे आहे. यापुढील काळात गहू, ज्वारी, मका यापासून इथेनॉल निर्मिती होणार असल्याने या धान्य उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. साखरेचा उत्पादन खर्च आणि साखरेला मिळणारे दर हे प्रमाण व्यस्त असल्याने साखर कारखान्यांना आर्थिक झळ सोसावी लागते. त्यामुळे साखर कारखान्यांनी यापुढील काळात उपपदार्थ निर्मितीवर भर दिला पाहिजे. साखर कारखाने हंगामी असल्याने सहा महिने चालतात तर त्यापुढील काळात बंद राहातात, हे ध्यानात घेता स्विट सोरघम पासून इथेनॉल निर्मिती केल्यास गळीत हंगामानंतर साखर कारखाने बारमाही बनतील, असे ते म्हणाले.                         श्री.गडकरी पुढे म्हणाले की, माजी आ.श्री.मुरकुटे यांनी उपपदार्थ निर्मिती प्रकल्पावर दूरदर्शीपणा दाखविला आहे. इन्सीनरेशन बॉयलरसाठी स्पेंटवॉश जाळल्याने पोटॅशची उपलब्धता होईल आणि त्यामुळे पोटॅशची आयात करावी लागणार नाही. इंडियन ऑईल कंपनी ४०० इथेनॉल पंपाला परवानगी देणार आहे. त्यामुळे अशोक कारखान्याने इथेनॉल पंप टाकावा. तसेच बायो डिझेल, बायो सिएनजी निर्मिती करावी. प्रेसमड व बगॅस यात पोटॅशची प्रक्रिया करुन सेंद्रीय खत निर्मितीही करावी. शेतकऱ्यांनी यापुढील काळात नॅनो युरिया, नॅनो खते यांचा वापर वाढवावा. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादन खर्च कमी करावा त्याचबरोबर एकरी उत्पादन वाढीवर भर द्यावा. गावातलं पाणी गावात शेतातलं पाणी शेतात यासाठी नदी, ओढे, नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करुन पाण्याची उपलब्धता वाढवावी. शेतीमध्ये सोलर पंपाचा वापर वाढवावा तसेच ठिबक सिंचनाचा वापर मोठ्या प्रमाणावर करुन एकरी उत्पादन वाढवावे. आपल्या शेतमालाची गुणवत्ता व दर्जा चांगला नसल्यामुळे फळे आयात होतात. यासाठी शेतकऱ्यांनी शेतमालाच्या गुणवत्ता वाढीवर भर द्यावा. यासाठी 'उत्तम बीज, उत्तम नर्सरी' उभाराव्यात. तसेच कोल्ड स्टोअरेज आणि फळ व भाजीपाला प्रक्रीया उद्योग उभारुन शेतकरी समृध्द व संपन्न करावा, असे आवाहन श्री.गडकरी यांनी केले.      

       अध्यक्षीय भाषणात माजी आ.भानुदास मुरकुटे म्हणाले की, भविष्यात शंभर टक्के वाहनांमध्ये इंधन म्हणून इथेनॉलचा वापर होणार आहे. जगभर इथेनॉलचा वापर वाढत असल्याने इथेनॉल निर्यात होणार आहे. हे लक्षात घेऊन आपले कारखान्याने नविन ६० हजार लिटर प्रतिदिन क्षमतेचा अल्कोहोल व इथेनॉल प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. इन्सीनरेशन बॉयलर उभारणी केल्याने स्पेंटवॉश जाळला जाईल. त्यामुळे प्रदुषण कमी होईल. या  बॉयलरमुळे दररोज प्रतितास दोन मेगावॕट विजनिर्मिती होईल व त्यावर नविन अल्कोहोल व इथेनाॕल प्रकल्प चालविले जातील. यामुळे महावितरणकडून जी वीज खरेदी होते त्याच्या खर्चात बचत होईल. तसेच झिरो प्रदुषणाचे उद्दिष्ट साध्य होईल. याद्वारे स्पेंटवॉश जळून मिळणाऱ्या पोटॅशचा वापर सेंद्रीय खतामध्ये केला जाईल. यामुळे शेतकऱ्यांना रासायनिक पोटॅश खताचा वापर करावा लागणार नाही. इन्सीनरेशन बॉयलरसाठी ३५ कोटीचा खर्च आला आहे. तर कंडेनसेट पॉलिसींग युनिटसाठी १५ कोटी चा खर्च आलेला आहे. असा एकूण ७५ कोटी खर्च या नविन प्रकल्पांसाठी आलेला असून यासाठी जिल्हा बँकेकडून ६५ कोटी रुपये कर्ज तर कारखान्याने १० कोटी स्वभांडवल उभारले आहे. यासाठी सभासद शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारची आर्थिक कपात करण्यात आलेली नाही, अशी माहिती श्री.मुरकुटे यांनी दिली. प्रमुख अतिथी आ.आशुतोष काळे म्हणाले की, साखर कारखान्यांचे तंत्रज्ञानात दिवसेंदिवस मोठे बदल होत आहेत. ते स्विकारावे लागतील. या नविन प्रकल्पांमुळे डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्प ३०० दिवस चालविणे शक्य होऊन कारखान्याला आर्थिक लाभ मिळेल. श्री.मुरकुटे यांचा या वयातील उत्साह पाहून माझ्यासारख्या तरुणांना प्रेरणा मिळते, असे श्री.काळे म्हणाले. आ.सत्यजित तांबे म्हणाले की, सध्याच्या काळात साखर हे उपउत्पादन तर अल्कोहोल व इथेनॉल हे प्रमुख उत्पादन बनले आहे. हे वेळीच लक्षात घेऊन श्री.मुरकुटे यांनी दूरदर्शीपणाने उपदार्थ निर्मिती प्रकल्पांची उभारणी केली. कारखाना ही मातृसंस्था आहे याचे भान ठेऊन श्री.मुरकुटे व त्यांचे संचालक मंडळ अशोक कारखाना जबाबदारीने सांभाळतात, असे श्री.तांबे म्हणाले.   

               नागपूर येथे कारखान्याचे संचालक विरेश गलांडे व ज्ञानेश्वर काळे यांनी ना.श्री.गडकरी यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार केला. कार्यक्रमात कारखान्याच्या ‌‘वाटचाल‌’ या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच अल्कोहोल व डिस्टीलरी प्रकल्प उभारणी करणाऱ्या मेगा इंजिनिअरींगचे श्री.शरद अभंग व इन्सीनरेशन बॉयलर उभारणी करणाऱ्या सिटसन इंडियाचे श्री.अमितकुमार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे यांनी केले. संचालक हिम्मतराव धुमाळ यांच्या अध्यक्षीय सूचनेस सोपानराव राऊत यांनी अनुमोदन दिले. सूत्रसंचलन आकाशवाणी समालोचक संतोष मते यांनी केले. कार्यक्रमास सभासद, शेतकरी, महिला, हितचिंतक, पत्रकार, वाहिन्यांचे प्रतिनिधी, कारखाना संचालक मंडळाचे सदस्य, अशोक बँकेचे पदाधिकारी, कारेगाव भाग कंपनीचे पदाधिकारी, बाजार समितीचे संचालक, शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य व अध्यापक, कामगार पतसंस्थेचे पदाधिकारी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

------------ महत्त्वाचे मुद्दे ------------

आ.आशुतोष काळे यांनी श्री.मुरकुटे यांनी भारत राष्ट्र समिती पक्षाऐवजी बदलत्या राजकारणाचा विचार करुन योग्य राजकीय निर्णय घ्यावा, असे आवाहन केले. तोच धागा पकडून आ.सत्यजित तांबे यांनी श्री.मुरकुटे हे सीए असल्याने त्यांचे राजकीय गणितही चांगले आहे. त्यांचे बीआरएस बाबतचे गणित बरोबर होते. परंतू तेलंगणाच्या नेत्यांचे गणित चुकले यात श्री.मुरकुटे यांचा काय दोष अशी मार्मिक टिपणी केली. यावर भाष्य करतांना श्री.मुरकुटे म्हणाले की, राज्यात राजकीय खेळखंडोबा झाल्याने आम्ही बीआरएसमध्ये गेलो. पण बदलत्या काळानुसार बदल स्वीकारावे लागतात. तेव्हा याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेऊ असे सूचक विधान केले. ----- रिपोर्टर दिपक कदम, श्रीरामपूर.