अहमदनगर जिल्ह्यातील या अभ्यासिकेची अभ्यासातून दिसली प्रगती त्यामुळे सविस्तर वाचा अभ्यासिकेची काय आहे महती.

अहमदनगर जिल्ह्यातील या अभ्यासिकेची अभ्यासातून दिसली प्रगती त्यामुळे सविस्तर वाचा अभ्यासिकेची काय आहे महती.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील देडगाव येथील अभ्यासिकेच्या उत्तुंग यशाचा मार्ग व खडतर प्रवास.

    महाराष्ट्रातील हर महसुली गावाच्या वैभवात भर टाकण्याचे काम शाळा मंदिरे, मस्जिद, व्यायामशाळा, सोसायट्या, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालये करताना दिसत असले तरी आता गावोगावी अभ्यासाचे महत्व सर्वांना पटत असल्याने सरकार, स्वयंसेवी संस्था ,खाजगी व्यक्तीच्या कृपेने ठिकठिकाणी स्पर्धा परिक्ष्यांच्या अभ्यासिका ही आता बाळस धरू लागल्या आहेत. परंतु पुरोगामी महाराष्ट्रात एक आगळी वेगळी अभ्यासिका म्हणून नोंद घेतली जाईल अशी अभ्यासिका अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील देडगाव या गावात पाहावयास मिळते .।

गावचे धार्मिक, राजकीय ,सामाजिक, आर्थिक नेतृत्व करणारी मंडळी जशी सापडते तशी भविष्यात शैक्षणिक नेतृत्व करणारी सुजन पिढी निर्माण व्हावी म्हणून देडगाव गावातील काही कल्पक, बुद्धीमान तरुणांनी गावातील तत्कालीन शिक्षकांच्या मदतीने माजी विद्यार्थी संघ देडगाव सुमारे वीस वर्षापूर्वी स्थापन केला आणि आजतागायत तो संघ टिकवून ठेवत त्या माध्यमातून गावची शैक्षणिक सेवा करत विविध उपक्रम सतत राबवले जातात .त्यातच गावामध्ये स्पर्धा परीक्षा चे वातावरण निर्माण करण्यासाठी एक अभ्यासिका असावी अशी संकल्पना साहित्यिक बथूवेल डी हिवाळे सर यांनी मांडल्यानंतर सर्व सक्रिय माजी विद्यार्थ्यानी वै.वांढेकर गुरुजींच्या स्मरणार्थ ‘अभ्यासातून प्रगतीकडे ‘हे ब्रीद मनात घेऊन देवगडचे महंत भास्करगिरिजी महाराजांच्या हस्ते उद्घाटन करून या अभ्यासिकेस चालना आणि प्रेरणा दिली. 

   २०१२पासून ते आजतागायत ही अभ्यासिका देडगाव गावातील नव्हे तर पंचक्रोशीतील खेड्यातील गोरगरिबांच्या घरात परिवर्तनाचा दिवा लावत अधिकारी बनविण्याचे पवित्र काम निरंतर करत आहे .

वै .वांढेकर गुरुजी अभ्यासिकेस अद्यापही स्व मालकीची जागा नाही तथापि बालाजी देवस्थान ट्रस्ट यांनी मोलाची मदत केल्याने देवस्थानच्या दोन प्रशस्त खोल्यांमध्ये ही अभ्यासिका सजली आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी टेबल- खुर्च्यांची व्यवस्था, पुस्तके वीज- पाण्याची व्यवस्था केलेली दिसतेच पण विविध स्पर्धा परीक्षांचे निकाल लागल्यावर मिरीटमध्ये सिलेक्शन झालेल्या यशवंतांच्या मार्गादर्शनाची पर्वणी या ठिकाणी आयोजकांकडून मिळतेच मिळते .  

       अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना येणार्‍या अडिअडचणींना सोडवण्यासाठी संघ नेहमी सकारात्मक असतो हे विशेष.

      या अभ्यासिकेच्या माध्यमातून आजपर्यंत परिचर ते मंत्रालय सहाय्यक या पदापर्यंत अनेक विद्यार्थी पोहचले आहेत पोलिस , मिलिटरी, महसूल, जिल्हा परिषदा सह इतर सरकारी कार्यालयात देडगावची मुले आता झळकू लागली आहेत. अधिकारी झालेली मुलेच येणार्‍या पिढीचे आयडॉल बनू पहात आहेत .यामुळेच गावाचे वातावरण निकोप बनून विद्यार्थ्यांच्या नाशाचा प्रकोप थांबला आहे . 

   गावातील सुज्ञ ग्रामस्थदेखील अभ्यासिकेला लग्नातील सत्काराचा पैसा अभ्यासिकेकडे वर्ग करत आहे, कोणी आपला वाढदिवस अभ्यासिकेत साजरा करून या अभ्यासिकेला हातभार लावत आहे, कोणी आपल्या कुटुंबातील सुख-दुखात प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ विविध वस्तु दान करत मदतच करत आहे .त्यामुळेच ही अभ्यासिका भौतिक वस्तूंनी परिपूर्ण बनत चालली आहे .म्हणूनच ही अभ्यासिका परिसरातच नव्हे तर जिल्हयाभरात चर्चेत राहिली आहे .

या अभ्यासिकेच्या स्वयंपूर्णतेसाठी माजी विद्यार्थी संघ देडगावचे माजी पदाधिकारी खंडू कोकरे, भास्कर तांबे, संजय कदम ,भाऊसाहेब सावंत ,संजय वांढेकर, संजय लाड, सर्जेराव ससाणे,विजय कदम,संदीप तांबे याबरोबरच विद्यमान पदाधिकारी अध्यक्ष नवनाथ फुलारी,सचिव नितिन गायकवड , उपाध्यक्ष रावण ससाणे ,महादेव बनसोडे, सागर बनसोडे ,किशोर वांढेकर ,प्रदीप मुंगसे ,संदीप नांगरे , पेटे अनिल विशेष प्रयत्न घेत आहेत .

     आपण कधी देडगाव या ठिकाणी आलात तर नक्की अभ्यासिकेला भेट देऊन स्वतः च्या गावात अशी समाजोपयोगी अभ्यासिका उभाराल अशी अपेक्षा माजी विद्यार्थी संघ देडगाव करतो .  

    आमच्या या वै.वांढेकर अभ्यासिकाचे यशवंत विद्यार्थी यांनी घेतलेली गरुड झेप व विविध क्षेत्रातील अधिकारी महाराष्ट्रात नव्हे तर देशात झळकत आहेत.

(शब्दांकन इन्नूस पठाण)