महाविकास आघाडीकडून बदलापूर घटनेचा काळ्या फिती लावून निषेध.बदलापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी...आ. कानडे
श्रीरामपूर - बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्यावतीने आज श्रीरामपूर शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी यावेळी केली.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील एका शाळेत तीन आणि चार वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात पोलिसांनी दाखवलेली दिरंगाई तसेच शाळा व्यवस्थापनाने हा प्रकार दडपण्याचा प्रकार केल्याने महाराष्ट्रभर संतापाची लाट पसरली आहे. या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदचे आवहन केले होते. परंतु न्यायालयाच्या आदर करुन काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी निदर्शने करण्यात येऊन सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना आ. कानडे म्हणाले, एक जुलैपासून आत्तापर्यंत राज्यातून 23 हजार मुली बेपत्ता झाल्या आहेत. यापैकी केवळ 111 प्रकरणांचा छडा लागला आहे. दिवसेंदिवस लेकीबाळींवर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. बदलापूरची घटना अशीच आहे. तीन वर्षाच्या कोवळ्या मुलीवर अत्याचार करण्यात आला. मात्र पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. शाळा व्यवस्थापनाने हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला. सदरची शाळा भाजपची असल्याने दडपण्याचे काम सरकारने केले हे दुर्दैव आहे. गृहमंत्री निवडणुकांमध्ये व त्यांच्या कमिशनखोरीमध्ये अडकलेले आहेत, आम्ही याचा निषेध करतो, असे म्हणत गृहमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आ. कानडे यांनी केली.
श्री. नाईक म्हणाले, बदलापूरची घटना ही मानवतेला काळीमा फासणारी आहे. राज्यात दिवसेंदिवस अशा घटना वाढत आहेत. या घटनेनंतर कोल्हापूरमध्ये अशीच घटना घडली. रोज कुठे ना कुठे घटना घडत आहेत. याचे सरकारला घेणे देणे नाही. अशा घटनांमधील आरोपींवर तात्काळ गुन्हे नोंदवून कारवाई केली पाहिजे व अशा गुन्ह्यांचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवला पाहिजे. बदलापूर घटनेतील आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी पेंटागॉन करिअर इन्स्टिट्यूटमधील श्रद्धा गोरे या विद्यार्थीनीने आवेशपूर्ण भाषण केले. तिच्या भाषणाने उपस्थितांची मने हेलावली. मर्चंट असोसिएशनचे दत्तात्रय धालपे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशी द्या, गृहमंत्री राजीनामा द्या, या सरकारचे करायचे काय? खाली डोके वर पाय तसेच राज्यातील महायुती सरकारचा निषेध असो, या घोषणानी परिसर यावेळी दुमदुमला होता.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, सतीश बोर्डे, विष्णुपंत खंडागळे, रमेश आव्हाड, नानासाहेब रेवाळे, सरपंच सागर मुठे, सरपंच अशोक भोसले, एनएसयुआयचे प्रदेश सचिव अक्षय नाईक, मल्लू शिंदे, सुरेश पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, नबाजी जगताप, माजी नगरसेवक कलीम कुरेशी, रज्जाक पठाण, दीपक कदम, भैय्या शहा, रफिक शेख, मुदस्सर शेख, समाजवादी पार्टीचे जोएब जामदार, रमेश निकम, रमेश अमोलिक, संदीप गुलदगड, श्री. देवराय, काँग्रेस महिला आघाडीच्या तालुका समन्वयक रुबीना पठाण, श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनचे प्रवीण गुलाटी, गौतम उपाध्ये, संजय कासलीवाल, धर्मेश शहा, निलेश बोरावके तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे लकी सेठी, ऍड. राजेश बोर्डे, प्रकाश पाऊलबुद्धे, शफी शहा, शिवसेनेचे अशोक थोरे, संजय छल्लारे, लखन भगत, तेजस बोरावके, निखिल पवार, सिद्धांत छल्लारे, सुधीर वायखिंडे आदिसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.......