श्रीरामपूर शहरातील रस्त्यांसाठी 17 कोटी रुपयांचा निधी मंजूर आमदार लहू कानडे.
श्रीरामपूर- श्रीरामपूर नगरपरिषद येथील अंतर्गत रस्त्यांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर), साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना आणि नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत 50 कामांसाठी साडेसात कोटींचा निधी मंजूर असून सर्व कामांचे कार्यारंभ आदेश दिले आहेत. यापैकी अनेक कामे सुरू झाले असून उर्वरित कामे लगेच सुरू होणार आहेत. तर शासनाच्या नगर विकास विभागाने नगरपरिषद क्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरि सेवा व सुविधा पुरविण्यासाठी (सन 22- 23 करिता) लेखाशीर्ष 3604-10 18 अंतर्गत 9 कोटी 69 लक्ष रुपयांचा निधी 19 रस्त्यांच्या कामासाठी दि. 6 ऑगस्ट 2024 रोजी मंजूर केलेला आहे यामध्येच श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील संगमनेर-नेवासा रोडच्या कामासाठी 3 कोटी रुपये मंजूर असून या सर्व कामांचे सविस्तर अंदाजपत्रके नगर परिषदेने तयार करून मजीप्राकडे तांत्रिक मान्यतेसाठी पाठविले आहेत. तांत्रिक मान्यता प्राप्त होतात जिल्हाधिकारी या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता देतील व सदरची कामे त्वरित हाती घेण्यात येणार असल्याचे आमदार लहू कानडे यांनी सांगितले.
सदरच्या कामासाठी सातत्याने दोन वर्षापासून आपण पाठपुरावा केल्यामुळेच शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला इच्छुक उमेदवार कधी आपणच निधी मंजूर केल्याचा तर आमदारांचे दुर्लक्ष होते म्हणून उपोषणाचे ढोंगही करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त करून श्रीरामपूर राहुरी मतदार संघातील दळणवळणासाठीची आवश्यक रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने करून टिकाऊ स्वरूपाचा विकास करण्यावर भर देण्यात येत असून दुसरीकडे शहर व ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या कामांना मंजुरी मिळवून कामे सुरू होत असताना सर्वांनीच सदरची कामे दर्जेदार होतील, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
संगमनेर नेवासा हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता नगरपरिषदेने फार वर्षांपूर्वीच नगरपरिषदेकडे वर्ग करून घेतलेला आहे. सदरच्या रस्त्याची लांबी जवळपास 4 कि.मी. असून त्याच्या उत्तम बांधणीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नियमित निधी येतो. या अंतर्गत बाभळेश्वर ते नेवासा फाटा रस्त्याचे रुंदीकरणाचे मोठे काम झाले. पण नगरपरिषद येथील रस्ता त्यामध्ये या तांत्रिक अडचणीमुळे घेता आला नाही. सन 21- 22, 22-23, 23- 24 व 24- 25 अशा प्रत्येक वर्षी या कामासाठी आपण निधीची मागणी केली पण निधी मिळू शकला नाही. पाठपुरावा केल्यानंतर आता 6 ऑगस्ट 2024 च्या शासन निर्णयामुळे सदरची अडचण दूर झालेली आहे. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सदरचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. तत्पूर्वी नगरपरिषदेला आदेश देऊन सदरच्या रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरता दिलासा मिळेल, असे काम हाती घेण्यात आलेले आहे. आमदार झाल्यापासून जवळपास 30 कोटी रुपयांचे रस्ते नगरपरिषद हद्दीत आपण केले असल्याचे आ. कानडे यांनी सांगितले.
आजच आ. कानडे यांच्या हस्ते श्रीरामपूर बेलापूर चौपदरी रस्त्याच्या दुभाजकांमध्ये वृक्षरोपणाच्या कामाचा शुभारंभ झाला. सदरच्या रस्त्याचे 2 कि.मी. अंतिम सिलकोटचे काम पावसामुळे थांबलेले आहे. तथापि पंधरा दिवसांमध्येच सदरचा रस्ता पूर्ण होऊन उद्घाटनासाठी तयार असेल, अशी माहिती आ. कानडे यांनी दिली. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक, एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस अक्षय नाईक, कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.