वळदगांव येथे जागतिक दिव्यांग प्रबोधन सप्ताह सोहळा उत्साहात साजरा

वळदगांव येथे जागतिक दिव्यांग प्रबोधन सप्ताह सोहळा उत्साहात साजरा

श्रीरामपूर : दिव्यांग व्यक्तींना प्रथमतः कौंटुबिक अवहेलनेला सामोरे जावे लागते. सामाजिक, शैक्षणिक,व्यावसायिक व नोकरी या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. दिव्यांग कायदा अधिनियम 1995 व 2016 अस्तित्वात आहे.परंतु त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होतांना मात्र दिसत नाही. त्यामुळे दिव्यांग व्यक्तीच्या जीवनात निराशेचे गडद ढग निर्माण झाले आहेत.सर्वसुविधा अस्तित्वात असणे आज काळाची गरज आहे. याकरिता आसान दिव्यांग संघटना सदोदित प्रयत्नशील आहे.वळदगांव पंचक्रोशीत खाण आहे म्हणून समाज मनाची जात आहे. असे प्रतिपादन दिव्यांग प्रबोधन मेळावा उद्घाटन प्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन व कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते संजय साळवे यांनी केले.

        वळदगाव ग्रामपंचायत, अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर, आसान दिव्यांग संघटना शाखा वळदगाव व पोलीस पाटील शिवाजी भोसले मित्रमंडळ वळदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत नियोजन भवन वळदगाव यांठिकाणी जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्त दिव्यांनी प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे, ह.भ.प.शुभम महाराज कांडेकर, अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षाताई गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक करणदादा ससाणे, अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक हिम्मतराव धुमाळ,माजी सरपंच प्रमोद भोसले,काॅंग्रेस कमिटी अध्यक्ष अरूण खंडागळे, वळदगाव पोलिस पाटील शिवाजी भोसले, अँड अभिजीत आहेर, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ शिंदे, आसान दिव्यांग संघटना वळदगाव शाखाध्यक्ष मेहमूद हाकिम यांची प्रमुख उपस्थिती होती.

         दिव्यांग व्यक्तीच्या जीवनात क्षितीजापलीकडील विश्व निर्माण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन मागील 27 वर्षांपासून सर्व प्रवर्गातील दिव्यांग व्यक्ती करिता सामाजिक चळवळीची मुहूर्तमेढ रोवणारे अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे व सचिव वर्षा गायकवाड पुण्यकर्माच्या कौतुकास पात्र आहेत.

             परदेशात दिव्यांग व्यक्ती रस्ता ओलांडताना विशिष्ट सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होते आणि सर्व  गाड्या जागेवर थांबविण्यात येतात.आपल्याकडे अद्याप आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले नाही.परंतु दिव्यांग क्षेत्रात नवी दिशा,नवी आशा निर्माण करणारे  संजय साळवे व वर्षाताई गायकवाड दिशादर्शक यंत्रणेचे काम करत आहेत.

         आज श्री हनुमान मंदिर जिर्णोध्दार व जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्त आयोजित दिव्यांग प्रबोधन मेळावा यांस उपस्थित राहता आले हे मी परमभाग्य समजतो मी माझा प्रत्येक वाढदिवस मूकबधिर विद्यालय,अंध विद्यालय,अनाथ आश्रम, वृध्दाश्रम यांठिकाणी साजरा करतो. त्यात खरे समाधान मानावे असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.

            याप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड यांनी दिव्यांगाच्या विविध प्रश्नांवर प्रकाशझोत टाकताना समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना देखील सांगून दिव्यांगा मध्ये आत्मविश्वासाची ज्योती प्रकाशित केली.

         अपंग आणि दिव्यांग शब्दातील तफावत संजय साळवे यांनी उदाहरणे देऊन स्पष्ट केली. ती मनाला खूपच भावली.आईवडिलांना न सांभाळणारी माणसं खरं तर दिव्यांग आहेत.अशा लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या प्रवचन प्रसंगी ह.भ.प.शुभम महाराज कांडेकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी भोसले यांनी केले तर आभार सौ शबाना हाकिम यांनी मानले.