पुणे कृषी महाविद्यालयाच्या गोपालन केंद्रात गो पर्यटकांची सुरुवात पुणेकरांना मिळाली तान- तनावापासून मुक्ती मिळवण्याची नविन नामि संधी.

पुणे, दि. २५ जानेवारी
पुणे कृषी महाविद्यालयाच्या मरीआई गेट येथील पशु संवर्धन व दुग्ध शास्त्र विभागामध्ये देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने गौ पर्यटनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या गौ पर्यटन संधीचा लाभ टेक्सटॅक्स यूएस कॉर्पोरेशन या अमेरिकन कंपनीचे संस्थापक अध्यक्ष व त्यांच्या १५ कर्मचाऱ्यांनी दिनांक २५ जानेवारी रोजी घेतला. या गौ पर्यटन संधीचा लाभ घेणारी ती पहिलीच गौ पर्यटकांची तुकडी ठरली. या कार्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गौ पर्यटनाची संधी देवयानी एम्. यांच्या योग ऊर्जा या संस्थेच्या माध्यमातून देण्यात आली.
या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने भारतातील दुधासाठी प्रसिद्ध असणाऱ्या साहिवाल, गीर, लाल सिंधी, थारपारकर व राठी या पाचही गोवंशांच्या जातीवंत गाई व वळू चे कळप भारताच्या कानाकोपऱ्यातून एकत्र करून जोपासले आहेत. दूध उत्पादनाकरिता प्रसिद्ध असणारे हे पाचही देशी दुधाळ गोवंश एकत्र उपलब्ध असणारे हे देशातील एकमेव केंद्र आहे. याशिवाय या केंद्रावर महाराष्ट्रातील खिलार, कोकण कपिला, डांगी, देवणी, लाल कंधारी व गौळाऊ या गाईंच्या जातींबरोबरच आंध्र प्रदेशातील लहान आकाराकरिता प्रसिद्ध असणारी पुंगनूर व मिनीएचर पुंगनूर गाई देखील उपलब्ध आहेत.
गौ पर्यटनाच्या दरम्यान सहभागी पर्यटकांना देशी गोवंशांचे महत्त्व, त्यांचे वर्गीकरण व उपयुक्तता, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची उद्दिष्टे, चालू असलेले संशोधन व इतर कार्य या विषयी अवगत केले जाते. या शिवाय पर्यटकांना येथील शाश्वत देशी गोपालनाचे मॉडेल, दुग्ध, गोमय व गोमूत्र प्रक्रिया करण्याचे एकात्मिक मॉडेल, गोबर गॅस व सौर ऊर्जा प्रणाली व गाईंच्या उपचाराकरता आवश्यक वनस्पतींचे संग्रहालय देखील इथे पहावयास मिळते. भारतातील ११ देशी गोवंश एकत्र एका ठिकाणी पाहण्याची व माहिती करून घेण्याची संधी उपलब्ध करून देणारी गो परिक्रमा प्रत्येकाने अनुभवावी अशी आहे. याच बरोबरीने गौ पर्यटनाच्या दरम्यान सर्व पर्यटकांना देशी गाईंची वासरे, कालवडी व गाईंच्या वात्सल्यपूर्ण सहवासात वेळ घालवून स्वतःच्या ताण-तणावातून सुटका करून घेण्याची संधी मिळते. इथे इच्छूकांना गायी वासरांना ओला हिरवा चारा, कडबा - वैरण, सुग्रास - पशुखाद्य, गुळ - डाळ असे गायींना पोषक पदार्थ खाऊ घालण्याचे आनंद व समाधान मिळविता येते.
या केंद्रावर गौ पर्यटनाच्या दरम्यान काऊ कडलिंग थेरपी चा लाभ देखील पर्यटकांना घेता येतो. काऊ कडलिंग चा शब्दशः अर्थ म्हणजे गाईला मिठी मारणे असा आहे. यामध्ये गाईला मिठी मारणे, तिच्या सानिध्यात, सहवासात वेळ घालवणे या गोष्टी अभिप्रेत आहेत. यामुळे आपल्याला गाईची उब आणि प्रेम मिळवता येते. गाईचे ऊब देणारे तापमान, धिम्यागतीचे हृदयाचे ठोके आणि गाईचे आकारमान यामुळे गाईला मिठी मारणाऱ्याला एक वेगळाच अनुभव मिळतो. आजच्या ताण-तणावांनी भरलेल्या धकाधकीच्या व वेगवान जीवनशैलीत काऊ कडलिंग मुळे माणसाला स्वतःच्या ग्रामीण उगमाकडे, निसर्गाकडे परत वळण्याची संधी मिळते. यामुळे ताण-तणाव निवळून निखळ आनंद मिळतो व सकारात्मक ऊर्जा मिळते व माणसांच्या मज्जासंस्थेमध्ये माया, ममता व प्रेम अश्या सकारत्मक भावना उत्पन्न करणाऱ्या हार्मोन्सची निर्मिती होऊन माणसांचे आपापसातील सोशल बॉण्डिंग वाढण्यास मदत होते. माणसाला शारीरिक, मानसिक व भावनिक स्थैर्य मिळते.
आज शहरी मुलांना जिथे गाय केवळ चित्रामध्ये किंवा लहान मोठ्या स्क्रीनवरच पाहायला मिळते, तिथे या गौ पर्यटनाच्या निमित्त्याने या मुलांना गाईची प्रत्यक्ष ओळख करून घेण्यासाठी देखील संधी उपलब्ध झाली आहे.
देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील गौ पर्यटन उपक्रम सशुल्क असून गौ पर्यटक कोणत्याही शनिवारी किंवा रविवारी पूर्व कल्पना देऊन या उपक्रमास उपस्थित राहू शकतात. सदरील गौ पर्यटनाचा लाभ मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषा समजणाऱ्या पर्यटकांना घेता येईल.
या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील गौ पर्यटन उपक्रमास चालना देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी चे कुलगुरू मा. डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी विशेष लक्ष दिले आहे. या उपक्रमास विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू मा. डॉ. सत्तापा खरबडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदरील प्रकल्प विद्यापीठाचे संचालक, संशोधन डॉ. विठ्ठल शिर्के व संचालक, विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास व या गौ पर्यटन उपक्रमास मदत व मार्गदर्शन करतात.
गौ पर्यटन उपक्रमादरम्यान पर्यटकांना डॉ. सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, डॉ. धीरज कंखरे, तांत्रिक प्रमुख, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, डॉ. मृणाल अजोतीकर, सहाय्यक प्राध्यापक, कृषी विस्तार, डॉ. सुजित भालेराव, सह-शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र व श्री. सचिन इंगवले, पशुधन पर्यवेक्षक हे सर्व पर्यटकांना माहिती व मार्गदर्शन करण्याचे तसेच आवश्यक ती मदत, सहाय्य करण्याचे काम करतात.
Quotes:
"आज आपल्या देशामधल्या गोवंशातील समृद्ध विविधतेची सर्वसामान्यांना ओळख व माहिती होणे गरजेचे आहे. विशेषतः शहरी लोकांना देशी गाईंचे आरोग्यातील महत्त्व याविषयी जाणीव होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने शहरी व ग्रामीण अशा सर्वच लोकांकरिता गौ पर्यटन उपक्रम हा एक सुखद अनुभव ठरणार आहे. त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा." - डॉ. सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र
"गाई वासरांच्या ममतेने भारावलेल्या सानिध्यात वेळ घालवण्याची एक जगावेगळी पर्वणी प्राप्त झाली. अतिशय आनंदी व उत्साही अनुभव मिळाला. सर्व पर्यटकांच्या मनातील व चेहऱ्यावरील आनंद व समाधान अवर्णनीय होते." - देवयानी एम्., संस्थापिका, योग ऊर्जा