जळगाव जिल्ह्याच्या पोलिसांची कारवाई. .. .चार गावठी कट्ट्यासह दोन जणांना घेतले ताब्यात..मुख्य आरोपी फरार. .. !!

जळगाव--: :
जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी श्रीरामपुरातील 2 जणांना 4 गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतले आहे. येथील सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा श्रीरामपूरचा बबन हा पोलिसांना हातावर तुरी देऊन फरार होण्यात यशस्वी झालेला आहे.
जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना काही संशयित चोपडा येथे गावठी कट्टा खरेदीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी त्वरीत कारवाईचे आदेश दिल्याप्रमाणे पथकाने रविवार दि.13 रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास चोपडा शहरातील शिवाजी महाराज चौकात सापळा रचला होता. त्यात जळगाव जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना संशयित वाहन आढळून आले असता पोलिसांनी या संशयित वाहनाची झडती घेतल्यानंतर त्यातून 4 गावठी पिस्टल व 10 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. पथकाने राजेंद्र ऊर्फ पप्पू भिमा चव्हाण (32, रा. खंडाळा,ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर),गणेश ज्ञानेश्वर सातपुते (23, रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर अंधाराचा फायदा घेत बबन उर्फ रोहित जाधव (रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनर)हा मुख्य आरोपी पोलिसांना चुकवून फरार होण्यात यशस्वी झाला आहे.फरार आरोपी बबन जाधव हा श्रीरामपूर शहरातील एका भाजपा नेत्याचा अतिशय निष्ठावान कार्यकर्ता असल्याने या भाजप नेत्याची देखील चौकशी होणार असल्याची चर्चा आहे. तसेच या घटनेबाबत जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,सदरील गुन्ह्यात दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी नामे बबन हा फरार आहे. तसेच या गुन्ह्यांमध्ये हुंडाई वेरना फोर व्हीलर ज्यावर टायगर ग्रुप अध्यक्ष, श्रीरामपूर असे लिहिलेले असून सदरील गाडी जप्त करण्यात आली असून बबन नावाच्या फरार झालेल्या आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे दिपककुमार शिंदे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस करत आहेत.