क्रॉसिंग पट्टे व गतीरोधक बसविण्याचे आश्‍वासन देऊन देखील कामे सुरु न केल्याचा निषेध

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-जामखेड महामार्गावरील निबोंडी ते चिंचोडी पाटील-आठवड गावा पर्यंत रस्त्यावर क्रॉसिंग पट्टे व गतीरोधक बसविण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडे जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. अधिकार्‍यांकडून एक ते दीड महिन्यात सदर काम करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र पाच महिने उलटून देखील सदर रस्त्यावर क्रॉसिंग पट्टे व गतीरोधक बसविण्यात आले नसल्याने, या रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार संबंधित अधिकारी असल्याचा आरोप करीत जन आधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी बुधवारी (दि.6 जुलै) राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे उपविभागीय अभियंता दि.ना. तारडे यांच्यावर शाईफेक करुन काळे फासले. 

नगर-जामखेड महामार्गावरील निबोंडी ते चिंचोडी पाटील-आठवड गावा पर्यंत परिसरात मोठे अपघात होत आहेत. पोलिस प्रशासनाच्या नोंदीनुसार वेगवेगळ्या अपघातमध्ये अनेक निष्पाप व्यक्तींचा जीव गेला आहे. अपघातामध्ये प्राण गमविलेल्या सर्व व्यक्ती या सामान्य किंवा मध्यम वर्गीय कुटूंबातील होत्या. परंतू या जागी कोणत्या नेत्याच्या परिवारातील व्यक्तींचा अपघाती मृत्यु झाला असता, निश्‍चित पणाने प्रशासनाने तात्काळ राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंता यांनी गतिरोधकांची व्यवस्था केली असती. परंतु सामान्यांचा जीव कीड्या-मुंग्याप्रमाणे जात आहे. संबंधित अधिकार्‍यांना अनेकांचा जीव जावून देखील जाग आलेली नाही. अधिकार्‍यांना जाग आनण्यासाठी त्यांचावर शाईफेक करण्यात आली असल्याचे पोटे यांनी सांगितले. 

अजून किती निष्पाप व्यक्तींनचे बळी गेल्यावर प्रशासन जागे होईल? यामुळे संघटनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. सदर रस्त्यावर क्रॉसिंग पट्टे व गतीरोधक बसविण्याचे काम पूर्ण न झाल्यास यापेक्षा तीव्र स्वरुपात आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.