पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात महात्मा फुले कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञांचा गौरव .
*पानी फाउंडेशनच्या कार्यक्रमात महात्मा फुले कृषि विद्यापीठ शास्त्रज्ञांचा गौरव*
*राहुरी विद्यापीठ, दि. 13 मार्च, 2023*
पानी फाउंडेशनच्या बालेवाडी, पुणे येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला. यावेळी पानी फाउंडेशनचे संस्थापक आणि प्रसिध्द सिनेअभिनेते आमीर खान, किरण राव, फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत भटकळ व्यासपीठावर उपस्थित होते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांना सुरुवातीला उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांना यावेळी गौरविण्यात आले. सोयाबीन शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद देशमुख यांचा यावेळी सोयाबीन पिकातील संशोधनाच्या योगदानाबद्दल विशेष गौरव करण्यात आला. यानंतर विद्यापीठ शास्त्रज्ञांचा सत्कार करण्यात आला. महात्मा फुले कृषि विद्यापीठ यांचा पानी फाउंडेशनबरोबर सामंजस्य करार झालेला आहे. या अंतर्गत विद्यापीठ नॉलेज पार्टनर म्हणून त्यांना तंत्रज्ञानाचे सहाय्य करत आहे.
गतवर्षी पानी फाउंडेशनने खरीप हंगामात सोयाबीन पिकावर डिजीटल शेतीशाळा ऑनलाईन पध्दतीने आयोजीत केली. यानंतर खरीप व रब्बी हंगामातील विविध पिकांवर अशा ऑनलाईन शेतीशाळा आयोजीत केल्या गेल्या. यामध्ये विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सक्रिय सहभाग घऊन शेतकर्यांना मार्गदर्शन केले. एका पिकाचे संपुर्ण तंत्रज्ञानाची शेतकर्यांना माहिती दिली गेली तसेच त्यांच्या अडचणी समजून घेऊन शास्त्रज्ञांनी त्यांचे समाधान करुन सखोल मार्गदर्शन केले. पानी फाउंडेशनच्या राज्यातील 39 तालुक्यांमधील 1500 शेतकरी गट ज्यामध्ये चाळीस हजार शेतकर्यांना या उपक्रमाचा फायदा झाला. या कार्यक्रमात पहिल्या तीन शेतकरी गटांना फार्मर कपचे रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमात बाजरी, मका, भात, ज्वारी, नाचणी, तूर, मूग, उडीद, भूईमुग, सोयाबीन, कापूस, ओवा, घेवडा, पत्ताकोबी/कोबी, कॉलीफ्लावर/फुलकोबी, शिमला मिरची, वांगी, भेंडी, कांदा, तोंडली, बटाटा, रताळे, भोपळा, टोमॅटो, कारले, दुधी भोपळा, पडवळ, दोडकी, घोसावळी, वाटाणा, मिरची, कोथिंबीर, मेथी, पालक, गवार या पिकांवर डिजीटल शेतीशाळा आयोजीत केल्या गेल्या. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला.