कोल्हार पुलावर ट्रॅक्टरचा अपघात; नगर–मनमाड महामार्ग ठप्प

कोल्हार पुलावर  ट्रॅक्टरचा अपघात; नगर–मनमाड महामार्ग ठप्प

कोल्हार पुलावर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघात; नगर–मनमाड महामार्ग ठप्प

प्रतिनिधी | प्रसाद घोगरे : ९३७०३२८९४४.

कोल्हार पुलावर आज सायंकाळी उसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. राहुरीकडून कोल्हारच्या दिशेने येणारा ट्रॅक्टर अचानक नियंत्रण सुटल्याने पुलाच्या एका बाजूला लटकला. अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नसली तरी परिसरात एकच खळबळ उडाली.

अपघातानंतर नगर–मनमाड महामार्गावरील वाहतूक अक्षरशः ठप्प झाली असून, दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

नियमबाह्य ट्रॉली लावून जीवघेणी वाहतूक; आरटीओचे दुर्लक्ष.

नगर–मनमाड महामार्गावर उसासह इतर मालाची वाहतूक करणारे अनेक ट्रॅक्टर दोन–दोन, कधी तीन–तीन ट्रॉली जोडून नियमबाह्य पद्धतीने धावताना दिसतात. या अतिभार वाहतुकीमुळे ट्रॅक्टरचा तोल ढळणे, ब्रेक फेल होणे, तसेच वळणांवर नियंत्रण सुटून गंभीर अपघात होण्याचा धोका प्रचंड वाढतो. तरीही आरटीओ प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सततच्या तक्रारी, अपघात आणि जीवितहानी होऊनही नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई न केल्याने महामार्गावर जीवघेणी परिस्थिती निर्माण होत आहे.

नगर–मनमाड महामार्गाची दुरवस्था ही काही नवीन बाब नाही. देशातील सर्वात खराब रस्त्यांपैकी या महामार्गाचे नाव घेतले जात असून, नागरिक उपरोधाने “हा रस्ता पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करा, कारण मृत्यूचा सापळा झालाय!” असे म्हणू लागले आहेत. अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम रखडत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

कोल्हार परिसरातील वाहतुकीची समस्या मात्र कायमच गंभीर. गेल्या २५ वर्षांपासून गावकऱ्यांच्या माथ्यावरचा वाहतुकीचा हा कलंक पुसत नाही. उत्तर–दक्षिण भारताला जोडणारा हा महत्त्वाचा महामार्ग, तसेच शिर्डी–शनि शिंगणापूरसारख्या धार्मिक स्थळांना जाणाऱ्या भाविकांसाठी हा रस्ता म्हणजे संकटाचा प्रवासच बनला आहे. खराब रस्त्यामुळे अनेक अपघात झाले असून शेकडो भाविकांचे प्राण गेले आहेत.

नगर जिल्ह्यातील दिग्गज नेते, ज्यांचे नाव राष्ट्रीय राजकारणात घेतले जाते, हेच या प्रश्नावर गप्प का? हा सवाल जनतेतून मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहे. “निवडणुकीत विमान थांबवतो, रेल्वे थांबवतो” अशा गप्पा मारणारे खासदार–नेते नगर–मनमाड महामार्गाच्या प्रश्‍नावर कुठल्या गुफेत गेले, असा चिमटा नागरिकांनी काढला आहे.

देशात जागतिक दर्जाचे महामार्ग उभे रहात असताना नगर–मनमाड महामार्ग मात्र भ्रष्टाचाराचे अड्डे आणि राजकीय ढिलाईचे प्रतीक बनल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.
महामार्गाच्या निकृष्ट अवस्थेमुळे नगर जिल्ह्याची देशभरात बदनामी होत असल्याची खंतदेखील प्रदेशभरातून व्यक्त होत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे..