विखे पाटील यांच्या पुढाकाराने मंत्रालयात आदिवासी व कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा
विखे पाटील यांच्या पुढाकाराने मंत्रालयात आदिवासी व कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा
मंत्रालय, मुंबई : प्रतिनिधी प्रसाद घोगरे.
अकोले तालुक्यातील राजूर येथून आदिवासी शेतकरी, अर्धवेळ परिचारिका, पोषण आहार तयार करणारे मदतनीस आणि विविध क्षेत्रातील कामगार यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हा लॉंग मार्च संगमनेरपर्यंत पोहोचल्यानंतर शासनाने तातडीने दखल घेत मंत्रालयात सविस्तर बैठक आयोजित केली.
बैठकीत संबंधित मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. बहुतांश मागण्या तत्त्वतः मान्य करण्याबाबत शिष्टमंडळाला सकारात्मक आश्वासन देण्यात आले. उर्वरित मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा करून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. शासन स्तरावर आदिवासी व कामगार बांधवांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते. तसेच आंदोलनाचे नेते आमदार विनोद निकोले, डॉ. अजित नवले, नामदेव भांगरे, नंदू डहाळे, हेमलताताई शेळके, कल्पनाताई धनवटे, रंजनाताई पर्हाड, वैशालीताई सुरसे यांच्यासह शिष्टमंडळातील प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान, शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, लवकरच ठोस निर्णय जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








