लोणी खुर्दमध्ये शेतकऱ्यांचा रस्ता बंद; तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
प्रसाद घोगरे | 9370328944 // Delhi91 प्रतिनिधी. 04/03/2026
लोणी खुर्दमध्ये शेतकऱ्यांचा रस्ता बंद; तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
अहिल्यानगर जिल्ह्यातील मौजे लोणी खुर्द येथे ओढा रुंदीकरणाच्या कामामुळे शेतकऱ्यांचा शेतीकडे जाणारा रस्ता बंद झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याबाबत संबंधित प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी खुर्द येथील गट क्रमांक ६० मध्ये अतिक्रमण काढून, ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. या कामादरम्यान गट क्रमांक ९० कडे जाणारा जुना शेतरस्ता उकरून काढण्यात आला. हा रस्ता अनेक वर्षांपासून शेतकरी व त्यांच्या पूर्वजांकडून वापरला जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या संदर्भात शेतकऱ्यांनी जनसेवा कार्यालयात तक्रार केली असता, अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन, १७ जानेवारी २०२६ रोजी तहसीलदार, जलसंधारण विभागाचे अधिकारी, सर्कल अधिकारी, तलाठी आणि शेतकरी यांच्या उपस्थितीत पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांना रस्ता पुन्हा करून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
मात्र त्यानंतर अनेक वेळा पाठपुरावा करूनही रस्ता अद्याप तयार करण्यात आलेला नाही. परिणामी शेतकऱ्यांना शेजारच्या शेतातून जावे लागत असून सध्या त्या शेतात मका पीक असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने जीवितास धोका असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.
सध्या दूध काढण्यासाठी शेतात जाणे भाग असल्याने शेतकऱ्यांना मका पिकातून पायी जावे लागत असून महिलांनाही डोक्यावरून दूध वाहून न्यावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने रस्ता उपलब्ध करून द्यावा, अन्यथा ७ मार्च २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा शेतकरी गणेश रमेश काळबाचे, शुभम दत्तात्रय आहेर आणि निखिल अनिल आहेर यांनी दिला आहे.









