शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज - कुलगुरु डॉ . पी . जी . पाटील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज - कुलगुरु डॉ . पी . जी . पाटील

*शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज* 

              *-कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील* 

 

*राहुरी विद्यापीठ, दि. 25 मार्च, 2024*

 

            सिंचनाखालील क्षेत्रात वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांनी जलसंधारणावर भर देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. विद्यापीठाने संशोधित केलेल्या नवनवीन शेती पद्धतींचा अवलंब जर आपल्या शेतीमध्ये केला तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथे शास्त्रीय सल्लागार समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील, कोल्हापूर येथील सहयोगी संशोधन संचालक डॉ. अशोक पिसाळ, पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे व बोरगाव कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. महेश बाबर याप्रसंगी उपस्थित होते. या बैठकीस अटारी पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. तुषार आठरे हे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. दरवर्षी कृषी विज्ञान केंद्रांमध्ये होणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेऊन पुढील वर्षी करावयाच्या नियोजित कामकाजाची दिशा ठरविण्यासाठी शास्त्रीय सल्लागार समिती बैठकीचे आयोजन करण्यात येत असते. यामध्ये विद्यापीठ स्तरावरील तसेच जिल्हास्तरावरील कृषी व कृषी संलग्न विविध विभागातील तज्ञ सहभागी होऊन केंद्राच्या प्रभावी वाटचालीसाठी मार्गदर्शन व सूचना देत असतात. या बैठकीमध्ये झालेल्या कार्यक्रमांमध्ये डॉ. सी. एस. पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये पिकावरील कीड रोग व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड रोग नियंत्रण पद्धतींचा अवलंब करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे असे सांगितले. याप्रसंगी रब्बी पिकातील कीड रोगांचे नियंत्रण या प्रकाशानाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्यातील प्रगतशील व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या बैठकीमध्ये डॉ. महेश बाबर यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या गतवर्षातील कार्याचा अहवाल सादर केला. या बैठकीसाठी कृषी संशोधन केंद्र, कराड, प्रकल्प संचालक, आत्मा, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक, सातारा जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सागर स सकटे यांनी तर आभार श्री. संग्राम पाटील यांनी मानले.