विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाकडून कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील यांचा भव्यदिव्य सत्कार सोहळा संपन्न.

विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाकडून कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील यांचा भव्यदिव्य सत्कार सोहळा संपन्न.

*विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या कामामुळेच विद्यापीठाचा नावलौकिक*

*-कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील* 

*राहुरी विद्यापीठ, दि.6 जानेवारी, 2025*

           विद्यापीठाच्या स्वतःच्या तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अपुऱ्या मनुष्यबळा अभावी हे विद्यापीठ चालवणे ही एक तारेवरची कसरत आहे. विद्यापीठात काम करत असताना मी आतापर्यंत नेहमी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. त्यांच्या बऱ्याचशा मागण्या खूप वर्षांपासून प्रलंबित होत्या. त्या मागण्या सोडविण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठाने आतापर्यंत केलेल्या शिक्षण, संशोधन व कृषि विस्तारच्या उत्कृष्ट कामामुळे विद्यापीठाला ए ग्रेड मानांकन मिळाले. विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी दिलेल्या योगदानामुळेच विद्यापीठाचा नावलौकिक होत आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच वर्षांपासून विविध प्रकारच्या प्रलंबित प्रश्न सोडविल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यासाठी ऋणनिर्देश सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील बोलत होते.

           विद्यापीठातील कर्मचाऱ्यांकरिता कारकीर्द प्रगती योजना, विविध पदोन्नतीचे आदेश, 12 /24 आश्वासित प्रगती योजना, कर्मचाऱ्यांच्या सोयीस्कर पदस्थापना, अनुकंपा भरती, सेवानिवृत्ती लाभ व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन, विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांची जाहिरात याबाबतीत कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी तप्तरतेने निर्णय घेऊन सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे प्रश्न मार्गी लावले. कर्मचारी हिताच्या निर्णयामध्ये सहाय्यक प्राध्यापक व त्यावरील पदे तसेच ब वर्ग अधिकारी यामध्ये उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिव व सुरक्षा अधिकारी यामध्ये 140 पदोन्नती व 168 वेतन निश्चितीची प्रकरणे मार्गे लावण्यात आली. कारकीर्द प्रगती योजनेमध्ये एकूण 310 प्रकरणे निकाली काढली गेली. सन 2021 ते सन 2024 या कालावधीमध्ये गट ब ते ड मधील सरळसेवेने 61 व पदोन्नती अंतर्गत 450 याप्रमाणे एकूण 511 पदे भरण्यात आली. सन 2024 मध्ये सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेनुसार एकूण 2199 इतक्या कर्मचाऱ्यांना लाभ मंजूर करण्यात आले. त्यामुळे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांचा भव्यदिव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाकडून करण्यात आले होते. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कुलसचिव डॉ. नितीन दानवले, नियंत्रक श्री. सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. संजय कोळसे व उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम उपस्थित होते.

       यावेळी डॉ. गोरक्ष ससाणे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले विद्यापीठाला दूरदृष्टी असणारे नेतृत्व लाभले आहे म्हणून विद्यापीठाचा नावलौकिक झाला आहे. कुलगुरूंनी कर्मचारी हितार्थ कल्याणकारी निर्णय घेतले आहे. प्रामाणिकपणे काम करणारे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे कुलगुरू आपल्याला भेटले आहेत. डॉ. विठ्ठल शिर्के आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या कार्यकाळात आपणा सर्वांना काम करायला मिळाले. या विद्यापीठासाठी काही योगदान देता आले, हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. हे कुलगुरू दातृत्वाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. असेच कुलगुरू सर्व विद्यापीठांना लाभावेत जेणेकरून तेथे काम करणाऱ्या प्रत्येकाचे कल्याण होईल. डॉ. साताप्पा खरबडे म्हणाले की विद्यापीठातील प्राध्यापकापासून वर्ग 3 व वर्ग 4 पर्यंत अशा सर्व घटकांच्या प्रश्नांबाबत विहित वेळेत योग्य निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना न्याय दिला. डॉ. नितीन दानवले आपल्या मनोगतात म्हणाले की आपले कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील म्हणजे एक उमदे, अष्टपैलू नेतृत्व आहे. त्यांनी घेतलेल्या ठाम व सकारात्मक निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांचे सर्वच प्रश्न मार्गी लागले आहेत. अशा या कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व अशा अनोख्या संगम असणाऱ्या कुलगुरूंना माझा सलाम आहे. यावेळी श्री. सदाशिव पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की विद्यापीठातील सर्वांचे कल्याण कसे होईल ही भावना कुलगुरूंची आहे. विद्यापीठातील कर्मचारी असो किंवा निवृत्तीवेतनधारक, यामध्ये कोणीही लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले. यावेळी डॉ. विजू अमोलिक, डॉ. संजय कोळसे, श्री. अमित पवार, श्री. सोमनाथ भुजबळ, श्री. निलेश पगारे, श्री. टी. एस. पाटील व श्री. विजय शेडगे आपले मनोगत व्यक्त केले.   

        या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाची पार्श्वभूमी डॉ. उत्तम कदम यांनी सांगितली. याप्रसंगी कर्मचारी समन्वय संघाच्या वतीने तसेच प्रकल्पग्रस्तांच्या वतीने कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावणाऱ्या प्रशासनातील व नियंत्रक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गणेश मेहत्रे यांनी तर आभार सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्षनाथ शेटे यांनी मानले. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रवींद्र बनसोड, निम्नस्तर कृषि शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके, धुळे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बबनराव हिले, हळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे, सर्व विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाचे सर्व पदाधिकारी, तसेच विद्यापीठ कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यातील संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.