अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा.

अहमदनगर : आरोपी नामे अजय उफ विनायक राजेंद्र गर्जे, वय-२० वर्षे, रा. खडांबे खुर्द, ता. राहुरी, जि. अहमदनगर याने अल्पवयीन मुलीस पळवून नेउन तिचेवर अत्याचार केल्याप्रकरणी मा. विशेष जिल्हा न्यायाधीश, श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी आरोपीस भा.द.वि. कलम ३६३, ३६६,३७६ (३), तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम ४, ६, ८ व १० या अन्वये दोषी धरून आरोपीस भा.द.वि. कलम ३७६ (३) नुसार २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड रु.५०००/- दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, भा.द. वि. कलम ३६६ नुसार ३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड रू. ३०००/- दंड न भरल्यास एक महिना साथी कैद अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून विशेष सरकारी वकील श्रीमती अॅड. मनिषा पी. केळगंद्रे शिंदे यांनी काम पाहिले.
सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी की,
दिनांक १७/१२/२०२२ रोजी रात्री ९ वा. वय वर्षे १२ असलेल्या अल्पवयीन पिडीत मुलगी हीस आरोपी नामे अजय उर्फ विनायक राजेंद्र गर्जे व गणेश राजेंद्र चव्हाण यांनी तिच्या आईवडिलांच्या कायदेशीर रखवालीतून चेंडूफळ ता. वैजापूर. जिल्हा. औरंगाबाद येथे पळवून नेले. त्यानंतर पिडीत मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरूध्द भा.द.वि कलम ३६३, ३६६ नुसार फिर्याद दिलेली होती. राहुरी पोलीसांनी पिडीत मुलीचा शोध घेउन, पिडीत मुलगी तसेच आरोपी यांना दिनांक २४/१२/२०२२ रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर राहुरी पोलीसांनी पिडीत मुलीचा जबाब नोंदविला, त्यावेळी पिडीत मुलीने सांगितले की, आरोपी अजय उर्फ विनायक गर्ने याने आरोपी गणेश राजेंद्र चव्हाण याचे मदतीने पिडीत मुलीला मोटारसायकलवर चेंडूफळ ता. वैजापूर, जि. औरंगाबाद येथे पळवून नेले होते. त्यानंतर आरोपी गणेश चव्हाण हा पिडीतेला व अजयला तेथेच सोडून मागे निघून आला. चेंडूफळ येथे एका पडीक खोलीमध्ये आरोपी अजय उर्फ विनायक गर्ने याने पिडीत मुलीवर बळजबरीने अत्याचार केले, पिडीत मुलीचा जबाब घेतल्यानंतर राहुरी पोलीसांनी आरोपी विरूध्द भा.द.वि कलम ३७६ तसेच पोक्सो कायदा कलम ३, ४,५,६ नुसार कलम वाढ केली. सदर घटनेचा संपूर्ण तपास पोलिस उपनिरिक्षक चारूदत्त खोंडे यांनी करून मा. न्यायालयात आरोर्पीविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकुण १० साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी तसेच पिडीत मुलीचे वडील, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, तसेच वयासंदर्भात ग्रामसेवक, बारागाव नांदूर यांची साक्ष नोंदविण्यात आली. पिडीत मुलीची साक्ष ग्राहय धरली. या केसची सुनावणी चालु असताना सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला की, पिडीत मुलगी ही घटनेच्या वेळी केवळ १२ वर्षे २ महिन्याची होती. अशा कमी वयामध्ये घडलेल्या घटनेमुळे बालमनावर अतिशय वाईट परिणाम होत असतो व त्याचे ओरखडे आयुष्यभर त्यांचे मनावर पडतात. आरोपीने अत्यंत वाईट पध्दतीने सदरची घटना केलेली आहे. त्यामुळे आरोपीला जर या केसमध्ये निर्दोष सोडले तर समाजातील वाईट प्रवृत्ती वाढीस लागून लहानग्या अल्पवयीन मुलांवर अशा घटना पुन्हा-पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वय वर्षे १२ वर्षे २ महिने असलेली अज्ञान मुलगी ही आरोपी विरुध्द काहीही कारण नसताना खोटे का सांगेल? त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी, सरकारी वकीलांचा युक्तीवाद तसेच आलेला संपूर्ण पुरावा ग्राहय धरून मा. न्यायालयाने आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. सदर खटल्याचे कामकाज सरकारी वकील म्हणून विशेष सरकारी वकील श्रीमती अॅड, मनिषा पी. केळगंद्रे शिंद यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी पो.कॉ. योगेश वाघ, तसेच पो.कॉ./ इफ्तेकार सय्यद यांनी सहकार्य केले.