लोकन्यायालयात प्रकरण मिटवून नवीन पर्वाला प्रारंभ करा ः प्रधान न्यायाधीश शेंडे
लोकन्यायालयात प्रकरण मिटवून नवीन पर्वाला प्रारंभ करा ः प्रधान न्यायाधीश शेंडे
नगर, ः लोकन्यायालयात प्रकरण मिटविल्याने कोणाचाही पराभव किंवा विजय नसतो. कौटुंबिक वाद, मालमत्तेची प्रकरणे हे आपण वाद न करता सामजस्यांने मिटवणे गरजेचे आहे. कौटुंबिक वाद आणि मालमत्तेचे प्रकरणे सामंजस्याने मिटविल्याने जीवनातील बहुमल्य वेळ, पैशांचा अपव्यय टाळून जीवनाच्या नवीन पर्वाला सुरूवात करता येते, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर आणि सेंट्रल बार असोसिएशन संयुक्त विद्यमाने शनिवार (ता. २८) राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन जिल्ह्यातील सर्व जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये करण्यात आले होते. अहमदनगर येथील लोकन्यायालयाचे उदघाटन रोपट्यास पाणी घालून पक्षकार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील, सचिव, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक साहेबराव डावरे, जिल्हा सरकारी वकील सतिश पाटील, अहमदनगर बार असोसिएशन उपाध्यक्ष ॲड. महेश शेडाळे, ॲड.भूषण बऱ्हाटे, ॲड. अनिल सरोदे आणि न्यायिक अधिकारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी प्रस्ताविक केले. लोकन्यायालयात सामंजस्याने प्रकरणे मिटविण्याचे फायदे सांगितले. पक्षकार आणि वकिलांनी लोकन्यायालयात प्रकरणे मिटविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. दोन्ही बारचे सदस्य व जिल्हा न्यायालयाचे कर्मचारी यांनी लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. ॲड. अभय राजे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. राजाभाऊ शिर्के यांनी आभार मानले.