*विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश खिंड येथील रोपवाटिकेस दोन तारांकण दर्जा प्राप्त.*
*राहुरी विद्यापीठ, दि. 9 मे, 2026*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत गणेशखिंड, पुणे येथे असलेल्या विभागीय कृषि संशोधन केंद्राच्या रोपवाटीकेस भारत सरकारच्या राष्ट्रीय बागवानी बोर्डामार्फत दोन तारांकन दर्जा देऊन प्रमाणित करण्यात आले आहे. सदरच्या दोन तारांकन दर्जाची मान्यता ही 2026-27 व 2027-28 या दोन वर्षासाठी असणार आहे. गणेशखिंड संशोधन केंद्राच्या रोपवाटीकेस राष्ट्रीय बागवानी बोर्डाच्या समितीने प्रत्यक्ष भेट देऊन रोपवाटिकेत असलेल्या विविध फळझाडांचे मातृवृक्ष प्लॉट, शेडनेट हाउस, पॉलिहाउस, पाणी देण्याच्या सुविधा, कलमे व रोपांची प्रत्यक्ष पाहणी करून दोन तारांकन दर्जाची मान्यता दिलेली आहे. रोपवाटिकेत असलेले मातृवृक्ष, मुलभूत सुविधा व कलमे रोपे यांची प्रत्यक्ष पाहणी करून राष्ट्रीय बागवानी बोर्डाच्या प्रमाणित करणार्या समितीने समाधान व्यक्त केले.
गणेशखिंड येथील रोपवाटिकेत फळझाडामध्ये विशेष करून आंबा, पेरू, सीताफळ, डाळिंब, लिंबू व चिकू इ.फळझाडांची कलमे मोठ्या प्रमाणावर तयार करून शेतकर्यांना नियमितपणे पुरवठा केला जात आहे. सध्या चालू हंगामामध्ये वरील फळझाडांची कलमे मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध आहेत. रोपवाटीकेस दोन तारांकन दर्जाची मानांकन मिळाल्यामुळे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता (कृषी) डॉ. साताप्पा खरबडे व उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भरत पाटील यांनी विभागीय संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. सुभाष भालेकर, रोपवाटिका प्रमुख व आदर्श रोपवाटिका प्रकल्पाचे मुख्य समन्वयक डॉ. बी. व्ही. गोंधळी व रोपवाटीकेतील इतर अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.








