*एनसीडीएक्स टिकर बोर्डमुळे शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळणार आधुनिक बाजार माहितीचे प्रभावी साधन.*
*राहुरी विद्यापीठ, दि. 15 मे, 2026*
कृषि मालाच्या किंमतीबाबत पारदर्शक आणि रियल-टाईम माहिती शेतकर्यांपर्यंत पोचविण्यासाठी एनसीडीइएक्स टिकर बोर्ड अत्यंत प्रभावी साधन ठरु शकते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या दर्शनीय भागात एनसीडीइएक्स टिकर बोर्ड बसविण्यात आला. यावेळी कुलगुरुंच्या हस्ते टिकर बोर्डचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. यावेळी कृषी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र हिले, प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन सदाफळ, कृषी अर्थशास्त्र विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भारतामध्ये कृषी मालांच्या किमतींची पारदर्शक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल कमोडिटी अँड डेरीवेटीव्हज एक्सचेंज लिमिटेड (एनसीडीइएक्स) हे एक अग्रगण्य कमोडिटी एक्सचेंज म्हणून कार्यरत आहे. या माध्यमातून विविध कृषी उत्पादनांचे दर निश्चित होतात आणि व्यवहार अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडतात. मात्र आजही ग्रामीण भागातील अनेक शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना बाजारातील अद्ययावत दरांची माहिती वेळेवर उपलब्ध होत नसल्याने योग्य वेळी विक्री न केल्याने त्यांच्या उत्पन्नावर प्रतिकुल परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर कृषी विज्ञान केंद्र, कृषी बाजार समिती आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना यांच्या स्तरावर टिकर बोर्ड बसविणे ही काळाची गरज असून ती एक अत्यंत उपयुक्त व प्रभावी योजना ठरू शकते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
कृषी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिले यांनी स्पष्ट केले की, टिकर बोर्डमुळे शेतकर्यांना थेट चालू बाजारभाव आणि भविष्यातील शेतमालाच्या भावाचे सौदे समजतील, ज्यामुळे दलालांवरील अवलंबित्व कमी होईल. या सुविधेमुळे शेतकर्यांना योग्य वेळी योग्य बाजारपेठेत माल विक्रीचा निर्णय घेणे सुलभ होईल आणि एफपीओंची सौदेबाजीची क्षमता वाढेल. तसेच, फ्युचर मार्केट आणि हेजिंगच्या माहितीमुळे शेतकर्यांना उत्पादन साठवणूक व पीक नियोजन अधिक शास्त्रीय पद्धतीने करणे शक्य होऊन शेती नफ्याची होईल.
टिकर बोर्ड हे केवळ एक डिजिटल साधन नसून ते शेतकर्यांच्या सक्षमीकरणाचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. अचूक बाजार माहितीच्या आधारे शेतकरी आणि एफपीओंनी बाजारातील जोखीम कमी करुन शेती अधिक नफ्याची आणि शाश्वत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन कुलगुरुंनी यावेळी केले.








