*पुणे कृषी हॅकथॉन २०२६ मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाला २५ लाखाचे प्रथम पारितोषिक.*
*राहुरी विद्यापीठ, दि. 19 मे, 2026*
कृषि विभाग महाराष्ट्र शासन आयोजित पुणे कृषि हॅकथॉन 2026 या राज्यस्तरीय स्पर्धेत महात्मा फुले कृषि विद्यापीठाने घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या संवेदक आधारित ताण विशिष्ट नत्र फवारणी यंत्र या नावीन्यपूर्ण प्रकल्पाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते रुपये 25 लाखाचे कृषि यांत्रिकीकरण या विषयांतर्गत प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या प्रकल्पाच्या संशोधक टीमचे सदस्य डॉ. अवधूत वाळुंज यांनी सदरचा पुरस्कार स्वीकारला. डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी डॉ. प्रणव पावसे आणि इंजि. भूमिका पांडे हे या प्रकल्पाच्या संशोधक टीमचे अन्य सदस्य असून हा प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या संकल्पनेतून साकार झाला आहे. या प्रकल्पाचे मार्गदर्शक म्हणून डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे यांनी काम पाहिले. या प्रयोगासाठी स्मार्ट आणि अचूक शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्रातील संवेदक सुविधांचा लाभ झाला.
पिकांच्या गरजेनुसार आवश्यक तिथेच मोजून मापून नत्राची मात्रा देणे या तंत्रज्ञानामुळे शक्य होणार आहे. यामुळे नत्राच्या खतात बचत होऊन संतूलीत खतांचा वापर होईल. यामुळे शेतकर्यांचा नत्रयुक्त खतांवरील खर्च कमी होऊन पर्यावरणाचेही रक्षण होईल. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या या संशोधक टीमच्या ऐतिहासिक यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी विजयी संघाचे विशेष अभिनंदन केले आहे.








