निकृष्ठ दर्जाचे रस्ते म्हणजे राहुरीचा विकास आहे का ? शिवसेना प्रमख देवेंद्र लांबे पाटील यांचा तनपुरे यांना सवाल
निकृष्ठ दर्जाचे रस्ते म्हणजे राहुरीचा विकास आहे का? - शिवसेना प्रमुख देवेंद्र लांबे पाटील यांचा तनपुरे यांना सवाल
- राहुरीचे लोकप्रतिनिधी म्हणतात रस्ते करून विकास केला, मात्र राहुरीकरांना केवळ निकृष्ट दर्जाचे डांबरी रस्ते जे सहा महिने देखील टिकत नाहीत, असे रस्ते मंजूर करून, त्यातही जवळच्या बगलबच्च्यांना कामे देता, निकृष्ठ रस्ते म्हणजे विकास आहे का असा सवाल शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र लांबे पाटील यांनी केला आहे.
याबाबत बोलताना देवेंद्र लांबे पाटील म्हणाले की, आ.तनपुरे यांना खरंच जर राहुरी तालुक्याचा विकास करायचा असता तर युवकांच्या शिक्षणासाठी उच्च शिक्षणाची व्यवस्था केली असती, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा म्हणून औद्योगिकरण वाढविले असते, तालुक्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणून सुसज्ज असा दवाखाना चालू केला असता. मात्र हे काहीच न करता केवळ भूलथापा देण्याचा प्रकार सुरू आहे. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधा आहेत याला विकास म्हणता येत नाही. गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये ९ खात्याचे मंत्रिपद मिळाल्यानंतर हायटेक राहुरी तालुका झाला असता परंतु विकास करण्याची मानसिकता नसल्यामुळे राहुरी तालुक्याचे वाटोळे झाले आहे.
ज्या कुटुंबाला राहुरी तालुक्याचा विकास करता येत नसेल अशा कुटुंबाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देण्याबाबत नागरिक देखील आता नक्कीच विचार करतील. राहुरी तालुक्याच्या विकासासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना राहुरी तालुक्यातील सुज्ञ नागरिक भरघोस मतांनी विजयी करणार ही कळ्या दगडावरची भगवी रेष आहे. केंद्रात महायुतीचे सरकार आहे,
राज्यात देखील महायुतीचे सरकार येणार आहे. मग केंद्रात व राज्यात सरकार महायुतीचे असेल तर राहुरी मतदार संघाचा विकास साधायचा असेल तर आपले मत महायुतीलाच देणे आवश्यक आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या योजना आखल्या, लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्गामध्ये समाधानाचे वातावरण असून विविध कल्याणकारी योजनामुळे जनता राज्यात महायुतीचे सरकार निवडून देईल.राहुरी तालुक्यात कुणाचाही धाक दडपशाही खपून घेतली जाणार नाही असे ही त्यांनी म्हटले आहे.