*कृषी दिनाचेऔचित्य साधून कुलगुरूंच्या हस्ते बी.बी.एफ.यंत्राद्वारे सोयाबीन पेरणीची सुरुवात.*विद्यापीठ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर उपक्रमाची सुरुवात*

*कृषी दिनाचेऔचित्य साधून कुलगुरूंच्या हस्ते बी.बी.एफ.यंत्राद्वारे सोयाबीन पेरणीची सुरुवात.*विद्यापीठ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर उपक्रमाची सुरुवात*

*राहुरी विद्यापीठ, दि. 1 जुलै, 2026*

 शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर एकदम कमी करणे शक्य नाही परंतु रासायनिक खतांचा संतुलीत वापर, हिरवळीच्या खतांबरोबर जैविक खतांचा वापर वाढविणे व शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देणे या गोष्टी केल्यास शेती फायदेशीर ठरेल. राहुरी कृषि विद्यापीठाने एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल विकसीत केले आहे. त्याचा वापर प्रत्येक शेतकर्याने आपल्या शेतीत करायला हवा. विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी आजचा कृषि दिन थेट शेतकर्यांच्या बांधवर साजरा होणे हे महत्वाचे पाऊल आहे. या कृषि दिनापासून विद्यापीठ थेट शेतकर्यांच्या बांधावर हा उपक्रम सुरु करत असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी केले.

 महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या भाकृअप शेतकरी प्रथम प्रकल्प व ग्रामीण कृषि मौसम सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषि दिन कार्यक्रमाचे आयोजन राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. विलास खर्चे बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, नियंत्रक डॉ. सचिन नांदगुडे, तांभेरे गावचे सरपंच उमेश मुसमाडे, कृषि तंत्रज्ञान शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजू अमोलीक, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भरत पाटील, कृषि रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भिमराव कांबळे, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, जीव रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश लोखंडे, आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. विजय पाटील, कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र हिले, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेश दोडके, कापूस पैदासकार डॉ. पवन कुलवाल, अ.भा.स. कृषि अवजारे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. तुळशीदास बास्टेवाड, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेचे प्रमुख डॉ. रवि आंधळे, फुले कृषि वाहिनीचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद चवई, प्रसारण केंद्र प्रमुख तथा शेतकरी प्रथम प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सचिन सदाफळ, सह समन्वयक डॉ. भगवान देशमुख व मेजर ताराचंद गागरे उपस्थित होते.

 यावेळी डॉ. गोरक्ष ससाणे मार्गदर्शन करतांना म्हणाले की शेतकरी प्रथम प्रकल्पामुळे विद्यापीठाचे तंत्रज्ञान तांभेरे गावात पोहचविण्यास मदत झाली आहे. फुले कृषि तंत्रज्ञान घरोघरी, समृध्दी येईल गावोगावी या संकल्पनेतुन विद्यापीठाचे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. डॉ. प्रशांत बोडके म्हणाले की सध्या एल निनोच्या परिस्थितीमुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभुमीवर बी.बी.एफ. तंत्रज्ञान फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. साताप्पा खरबडे म्हणाले की या विद्यापीठाने 320 पेक्षा जास्त वाण तसेच 2000 पेक्षा जास्त तंत्रज्ञान शिफारशी शेतकर्यांसाठी प्रसारीत केल्या आहेत. 2000 पेक्षा जास्त कृषि शिक्षणासंबंधीचे सामंजस्य करार केले आहेत. विद्यापीठ 10 जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात 15 सरकारी महाविद्यालये व 63 खाजगी महाविद्यालये व कृषि तंत्र विद्यालये यांच्या माध्यमातून कृषि शिक्षणाचे कार्य करीत आहे. याप्रसंगी सरपंच उमेश मुसमाडे म्हणाले की शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत गावात विविध प्रात्यक्षिकांचे आयोजनाबरोबरच आभ्यास दौर्यांचेही आयोजन करण्यात आले. एकात्मिक शेती पध्दतीच्या मॉडेलमुळे शेतकर्यांच्या उत्पादनात व उत्पन्नात वाढ झाली आहे. यावेळी डाळिंब उत्पादक श्री. कल्याण गाडे, प्रगतशील शेतकरी मेजर ताराचंद्र गागरे, संगमनेरी शेळी पालक सौ. किर्ती गागरे, शेतकरी महिला सौ. रेश्मा गागरे व सौ. सुषमा मुसमाडे व देशातील प्रसिध्द युट्युबर श्री. आदित्य डेरे यांचा कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

 या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. सचिन सदाफळ यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महेश मुसमाडे यांच्या प्रक्षेत्रावर कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या हस्ते बी.बी.एफ. यंत्राने सोयाबीनची पेरणी करण्यात आली. सदरच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन अ.भा.स. कृषी अवजारे व यंत्रे प्रकल्पातर्फे करण्यात आले होते. यासाठी बीबीएफ यंत्राचे उत्पादक रोहित कृषी, पुणे आणि बीबीएफ यंत्राचे राहता तालुका वितरक श्रीराम ट्रॅक्टर्स, राहता यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी कणगर येथील राजेंद्र वरघुडे यांच्या मुक्त गोठा, शेळीपालन व परसबागेतील कुक्कुटपालन प्रकल्प, कल्याण गाढे यांची डाळिंब बाग, तांभेरे येथील ऋतिक गागरे यांच्या गांडूळखत व जैविक निविष्ठा निर्मिती प्रकल्पास मान्यवरांनी भेटी दिल्या. तांभेरे येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी केले तर आभार डॉ. भगवान देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला कानडगाव येथील नानासाहेब गागरे, बाळासाहेब धोंडे, मधुकर घोरपडे, तांभेरे येथील जालिंदर मुसमाडे, भाऊसाहेब निमसे, संभाजी डेरे व महेश गागरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शेतकरी प्रथम प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहयोगी विजय शेडगे, प्रक्षेत्र सहाय्यक किरण मगर व राहुल कोर्हाळे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमामध्ये तांभेरे गावातील 150 हुन अधिक शेतकरी उपस्थित होते.