अहिल्यानगर - शिर्डी महामार्गाच्या निकृष्ठ व संथ कामाबाबत विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवा ; कृती समितीची आ. प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मागणी

अहिल्यानगर - शिर्डी महामार्गाच्या निकृष्ठ व संथ कामाबाबत विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवा ; कृती समितीची आ. प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मागणी

*​अहिल्यानगर-शिर्डी महामार्गाच्या निकृष्ट व संथ कामाबाबत विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवा; कृती समितीची आ. प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मागणी*

 

           अहिल्यानगर ते शिर्डी (NHAI-160) महामार्गाचे काम सध्या अत्यंत संथ गतीने आणि निकृष्ट दर्जाचे सुरू असून, यामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांवर आगामी पावसाळी अधिवेशनात जाहीर आवाज उठवावा, अशी मागणी 'नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समिती' आणि राहुरीकरांच्या वतीने आमदार प्राजक्त (दादा) तनपुरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

​            महामार्गाच्या दुरवस्थेमुळे आणि नियोजनशून्य कामामुळे आजवर शेकडो निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर हजारो प्रवासी कायमचे अपंग झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कृती समितीने महामार्गाच्या कामातील तांत्रिक त्रुटी आणि नागरिकांच्या प्रमुख समस्यांकडे आमदारांचे लक्ष वेधले आहे.

​निवेदनातील प्रमुख मुद्दे व त्रुटी

  रस्त्याची कमी केलेली रुंदी व गटारींचा धोका:

          महामार्गाची मूळ मंजूर रुंदी ३० मीटर असताना, प्रत्यक्षात मात्र केवळ ९ मीटरचाच रस्ता बनवला जात आहे. या ९ मीटर रस्त्याला अगदी खेटूनच गटारी बांधल्या जात असल्याने पादचारी, दुचाकीस्वार आणि शाळकरी विद्यार्थ्यांना रस्त्याच्या कडेने ये-जा करणे अत्यंत धोक्याचे व जीवघेणे बनले आहे.

​राहुरी शहरातील रस्त्यांची उंची व व्यावसायिकांचे नुकसान:

       राहुरी शहरी भागात महामार्गाची उंची अवाजवी वाढविल्यामुळे शहर परिसरातील सर्व अंतर्गत रस्ते खाली गेले आहेत. यामुळे पावसाळ्यात शहराचे पाणी तुंबण्याची भीती निर्माण झाली असून, स्थानिक व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये जाणे कठीण झाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

​अपुऱ्या रुंदीचे दुभाजक (डिव्हायडर):

             महामार्गाच्या मधोमध बांधण्यात येत असलेले दुभाजक अत्यंत कमी रुंदीचे आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना किंवा वाहनांना रस्ता ओलांडताना अंदाज येत नसल्याने येथे मोठ्या अपघातांची मालिका सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

​महिन्याभरातच पडलेले भगदाड (निकृष्ट कामाचा नमुना):

          राहुरी परिसरातील सूतगिरणी समोरील महामार्गाच्या मधोमध अवघ्या एक महिन्यापूर्वी एका कलव्हर्टचे (मोरी) काम करण्यात आले होते. निकृष्ट दर्जामुळे या कलव्हर्टच्या ठिकाणी महामार्गाच्या मधोमध आताच मोठे भगदाड पडले आहे, तसेच रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. यावरून कामाचा दर्जाहीनपणा स्पष्ट होत आहे.

​कृती समितीच्या प्रमुख मागण्या:

​१. शहरी भागांमध्ये रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गटारी या मध्यभागापासून १५ मीटर अंतरावर घेण्यात याव्यात, जेणेकरून रस्ता सुरक्षित व प्रशस्त होईल.

२. या महामार्गाच्या सुरू असलेल्या संपूर्ण निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.

       ​आगामी विधिमंडळ अधिवेशनामध्ये या निकृष्ट व जीवघेण्या कामाबाबत सभागृहात जाहीर आवाज उठवून संबंधित प्रशासनाला व ठेकेदाराला जाब विचारावा आणि जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी नम्र विनंती कृती समिती व राहुरीकरांच्या वतीने आमदार तनपुरे यांना देण्यात आलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

.         याप्रसंगी रस्ता दुरुस्ती कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र लांबे, नवनीत दरक, संतोष भुजाडी, संदीप गाडे, जनार्धन म्हसे,प्रशांत वाबळे,प्रितेश तनपुरे, सतिष घुले उपस्थित होते.