डॉ. मिलिंद अहिरे यांना डॉ . वाय .पी . सिंघ मेमोरिअल पुरस्कार प्रदान
*डॉ. मिलिंद अहिरे यांना डॉ. वाय. पी. सिंघ मेमोरिअल पुरस्कार प्रदान*
डॉ. मिलिंद आहिरे यांनी शिक्षण, संशोधन आणि विस्तार संशोधनातील प्राविण्य आणि विस्तार शिक्षणामध्ये केलेल्या दैदिप्यमान कार्याबद्दल नवी दिल्ली येथील भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीचा मानाचा मानला जाणारा डॉ. वाय. पी. सिंग मेमोरियल पुरस्कार 2026-27 देऊन त्यांना गौरविण्यात आले. भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीचा गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय परिसंवादात भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ. आर. के. सिंग आणि माजी उपमहासंचालक डॉ. यु. एस. गौतम यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार डॉ. मिलिंद आहिरे यांना देण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे विद्यापीठाच्या विविध स्तरातुन अभिनंदन होत आहे.
डॉ. मिलिंद अहिरे सध्या कृषि विस्तार व संज्ञापन विभागात प्राध्यापक म्हणुन कार्यरत आहे. या आधी त्यांनी कृषि महाविद्यालय, धुळे आणि हाळगावचा सहयोगी अधिष्ठाता पदाचा पदभार सक्षमपणे सांभळला आहे. कृषि विस्तार व संज्ञापन विभागाचे विभाग प्रमुख म्हणुन पाच वर्ष कार्यक्षमपणे पदभार सांभाळला आहे. याआधी त्यांनी भाकृअप समन्वय अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार आणि विद्यापीठाच्या नियोजन, मुल्यमापन आणि देखरेख प्रकल्पाचे प्रमुख म्हणुन सक्षमपणे काम पाहिले आहे. डॉ. मिलिंद अहिरे यांनी 2005 साली जी.बी. पंत कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठातुन कृषि विस्तार या विषयात पीएच.डी. संपादन केली आहे. कृषि विद्यापीठात त्यांना विविध पदांचा ३० वर्षाचा अनुभव आहे. भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीच्या उपाध्यक्षपदी, महाराष्ट्र सोसायटी ऑफ एक्सटेन्शन एजुकेशनच्या सहसचिवपदी त्यांची नेमणुक असुन सोसायटी ऑफ कृषि विज्ञानच्या पश्चिम विभागाचे समन्वयक म्हणुन ते काम बघत आहे. आग्रा येथील विस्तार शिक्षण सोसायटीचे इंडियन रीसर्च जर्नल ऑफ एक्सटेंशन एजुकेशनच्या संपादकीय मंडळाचे सदस्य म्हणुन कार्यरत आहेत.डॉ मिलिंद अहिरे दोन वर्षांपासून विद्यापीठांची अधिस्वीकृती देणाऱ्या राष्ट्रीय मुल्याकंन आणि मान्यता परिषद, बेंगळुरू वर सदस्य म्हणून काम करत आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगावर विषय तज्ञ म्हणून काम करत आहेत. धुळे येथील कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणुन त्यांनी चार वर्ष शेतकरीभिमुख विस्तार कार्य केले आहे. त्यांनी आतांपर्यंत ३४ एम.एस्सी. (अॅग्री) आणि पीएच.डी. च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. कृषि विद्यापीठाचे प्रसारण केंद्र प्रमुख असताना त्यांनी विविध विद्यापीठ प्रकाशनांचे संपादन केले आहे. यामध्ये कृषिदर्शनी, श्रीसुगी, कृषिवार्ता असे अनेक प्रकाशनांचे संपादन त्यांनी केले आहे. राज्यस्तरीय विविध समित्यांवर त्यांची तज्ञ सल्लागार आणि सदस्य म्हणुन नेमणूक आहे. त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. यामध्ये मानाचे समजले जाणारे डॉ. जी.एस. विद्यार्थी मेमोरीयल पुरस्कार आणि युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे आतांपर्यंत 100 शास्त्रीय लेख विविध शास्त्रीय नियतकालीकांमध्ये प्रसिद्ध झाले असुन विविध पुस्तकांचे त्यांनी संपादन केलेले आहे. डॉ. मिलिंद अहिरे यांचे शेतकर्यांसाठी 61 हून अधिक कृषि विषयक लेख वृत्तपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.








