मोबाईल खेळण म्हणून वापरला तर आयुष्यचं खेळण होईल; पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने झाडे लावावीत" – पद्मभूषण पोपटराव पवार
"मोबाईल खेळण म्हणून वापरला तर आयुष्यचं खेळण होईल; पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने झाडे लावावीत" – पद्मभूषण पोपटराव पवार
चिडले परमानंद (ता. नेवासा) प्रतिनिधी :संभाजी शिंदे
नेवासा तालुक्यातील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात आज दिनांक २९ जून रोजी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक . सुधाकर गडाख यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भव्य निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख साहेब होते, तर पद्मभूषण पोपटराव पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमास पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून गेलं. सुधाकर गडाख यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यामध्ये डॉ. विनायक देशमुख (सहसचिव, मुळा एज्युकेशन सोसायटी), प्रशासन अधिकारी घुले मामा, एस. बी. शेटे साहेब, गटविकास अधिकारी पाटेकर साहेब, कारभारी डफाळ, हिवरे बाजार सोसायटीचे चेअरमन छबुराव ठाणगे, माजी नगरसेवक अशोक घाडळकर, प्रभाकर कोलते खरेदी-विक्री संघाचे चेअरमन, पोपटराव पादीर, मुळा सहकारी साखर कारखान्याचे संचालक चंद्रकांत टेमक, कारभारी डफा ळ, ज्येष्ठ पत्रकार विनायकराव दरंदले, जयवंतराव लिपाने, तसेच खेडले, परमानंद, शिरेगाव आदी गावांतील ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक व श्री. गडाख यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री लहानु ढाले सर यांनी शाळेविषयी व खडक सरांविषयी माहिती देताना शाळेत चालणाऱ्या अनेक उपक्रमांची माहिती दिली.
निरोपाला उत्तर देताना श्री. सुधाकर गडाख यांनी आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवाकाळातील अनेक आठवणींना उजाळा दिला. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करताना लाभलेले प्रेम, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि समाजाचा विश्वास हीच आपल्या आयुष्याची खरी कमाई असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी आपल्या जीवनप्रवासात प्रत्येक टप्प्यावर खंबीरपणे साथ देणाऱ्या सहचारिणी सौ. निर्मलाताई गडाख यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, "त्यांच्या सहकार्यामुळेच मी माझी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू शकलो," अशा भावनिक शब्दांत भावना व्यक्त केल्या.
तसेच मुळा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, ज्येष्ठ साहित्यिक यशवंतरावजी गडाख यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. संपूर्ण गडाख कुटुंबाने आयुष्यभर दिलेल्या प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळेच आपला जीवनप्रवास समृद्ध झाला, असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रशांत भाऊ गडाख यांच्याविषयीच्या आठवणी सांगताना श्री. गडाख यांना अश्रू अनावर झाले. "माझ्या आयुष्यात अत्यंत बिकट परिस्थिती असतानाही गडाख कुटुंबाने मला दिलेले मोलाचे सहकार्य मी कधीही विसरू शकत नाही," असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. तसेच बदलीनंतर शिवभारतकार कवी परमानंद यांच्या पावन भूमीत आपला निरोप समारंभ होत असल्याचे आपण मोठे भाग्य समजत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुणे पद्मभूषण पोपटराव पवार यांनी आपल्या मार्गदर्शनात निसर्ग आणि मानव यांच्यातील अतूट नातेसंबंध स्पष्ट केले. जन्मापासून ते जीवनातील प्रत्येक टप्प्यावर निसर्ग मानवाला आधार देत आला आहे. मात्र आधुनिक काळात माणसाने निसर्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने त्याचे दुष्परिणाम आता संपूर्ण मानवजातीला भोगावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
याचबरोबर विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, "मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा. मोबाईल खेळण म्हणून वापरला तर आयुष्यचं खेळण होईल. मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचे जीवन भरकटत आहे. त्यामुळे किमान दहावीपर्यंत मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका," असे प्रभावी प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान नामदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते पद्मभूषण पोपटराव पवार यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात नामदार शंकरराव गडाख यांनी सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्याचा शेवट नसून नव्या जीवनपर्वाची सुरुवात असल्याचे सांगितले. निवृत्तीनंतर आरोग्य, समाजसेवा, कुटुंब आणि छंद यांना प्राधान्य दिल्यास जीवन अधिक आनंदी, समाधानी आणि अर्थपूर्ण होऊ शकते, असे त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. अत्यंत भावनिक, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा निरोप समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रेवन्नाथ पवार यांनी केले, तर सुभाष जाधव यांनी उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामस्थ, शिक्षक, कर्मचारी व पाहुण्यांचे आभार मानले.








