घोडेगाव येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न...
घोडेगाव येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न...
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी // संभाजी शिंदे
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे - शुक्रवार दि. 27 डिसेंबर 2024 रोजी फा. अब्राहाम यांच्या मार्गदर्शनाखाली व पिटर बारगळ सर यांच्या नेतृत्वाखाली माजी विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लहानपणी नकोशे वाटणारे वसतिगृह बाहेर पडल्यानंतर मात्र सर्वांना हवेहवेसे वाटते. वसतिगृहाची तर गोष्टच काही औरच असते. याचा प्रत्यय शुक्रवारी ख्रिस्त राजा चर्च, घोडेगाव येथे झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आला. जवळपास 25 ते 30 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांनी वसतिगृहात व शाळेत असताना केलेल्या गमती-जमती, मिशनरी धर्मगुरूंनी व शिक्षकांनी केलेली शिक्षा, अशा अनेक आठवणींना उजाळा दिला. ख्रिस्त राजा चर्च, घोडेगाव संचलित, संत थॉमस मुलांचे वसतिगृह व संत ॲनिज मुलींचे वसतिगृहात शिक्षण घेतलेल्या 1964 - 65 पासून ते 2019 - 20 पर्यंत शिक्षण घेतलेल्या मुलांमुलींसाठी पहिल्यांदाच या मेळाव्याचे आयोजन नियोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यार्थी या वेळी एकत्र आले. धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक जण आपापल्या कामात गुंतलेला आहे; पण वसतिगृहाची आठवण कायम येत असल्याचे प्रत्येकाच्या तोंडून निघाले. कार्यक्रमाची सुरुवात फा. अब्राहाम रणनवरे, प्रमुख धर्मगुरू, ख्रिस्त राजा चर्च व फा. झेवियर यांच्या प्रार्थनेने चर्च मधून सुरू झाली. मेळाव्यासाठी मुंबई, पुणे अहमदनगर व विविध खेड्यातून मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.
अशोक भाऊ शिदोरे, प्रकाश गायकवाड, प्रविण साळवे, विजय सातदिवे, कारभारी मकासरे, सतिश सर, बनसोडे यावेळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व आपला वैयक्तिक अनुभव सांगितला. वसतिगृहाच्या आठवणी शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. होस्टेलमध्ये खरे आयुष्य जगायला मिळाले होते. शिस्त संस्कार व आध्यात्मिकता वसतिगृहातच शिकायला मिळाली. वसतिगृहातील वातावरण खूपच छान होते. आम्हाला सर्व मिशनरी धर्मगुरूंनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आम्ही आज चांगल्या पदांवर कार्यरत आहोत. आम्ही वसतिगृहात खूप वर्षांनंतर आलो आहे. मित्रांना भेटण्याचा आनंद अत्यंत दुर्मिळ आहे. वसतिगृहात असताना केलेल्या मौजमजेच्या आठवणी ताज्या झाल्या. आजचा दिवस आयुष्यात फार महत्त्वाचा असेल. आम्ही सर्व मित्र होस्टेलच्या फादरांना शिक्षकांना खूप त्रास द्यायचो, पण आता त्यांच्याबद्दल प्रेम वाटते. कारण ते त्यावेळी आमच्याशी वागायचे ते आमच्या सर्वांच्या भल्यासाठी होती. आम्ही मित्र खूप हुशार व खोडकर होतो. यावेळी कार्यक्रमाचे उत्कृष्ट रित्या आयोजन नियोजन केल्याबद्दल सर्व माजी विद्यार्थ्यांनी फा. अब्राहाम, फा. झेवियर, पिटर बारगळ सर, कोमल बोधक व सचिन बनसोडे यांचे आभार मानत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. फा. अब्राहाम यांनी देखील विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला. संत थॉमस होस्टेल विद्यार्थ्यांना भेटून मनस्वी आनंद झाला आपली आध्यात्मिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगती पाहून मी भारावून गेलो. तुमच्यामधील मैत्री प्रेरणादायी आहे. तुमची व तुमच्या परीवाराची अशीच प्रगती व्हावी ही बाळ येशू कडे प्रार्थना. प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीने पुढे येऊन आपली वैयक्तिक माहिती सर्वांना दिली. सर्वांसाठी चहा, नाष्टा व प्रीतीभोजनाची व्यवस्था केली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समन्वयक व पी. आर. ओ. पिटर बारगळ सर, युवक प्रतिनिधी सचिन बनसोडे, करण गायकवाड व कोमल बोधक यांनी परिश्रम घेतले.