मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे चर्चा सत्र व प्रक्षेत्र भेट संपन्न , शास्त्रज्ञांचा सन्मानच राष्ट्राच्या प्रगतीचे द्योतक - कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे चर्चा सत्र व प्रक्षेत्र भेट संपन्न , शास्त्रज्ञांचा सन्मानच राष्ट्राच्या प्रगतीचे द्योतक - कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील

*मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे चर्चाचत्र व प्रक्षेत्र भेट संपन्न*

*उसाचे फुले ऊस 15012, फुले ऊस 13007 व फुले ऊस 15006 हे वाण अधिक सरस* 

*-कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील* 

 

*शास्त्रज्ञांचा सन्मानच राष्ट्राच्या प्रगतीचे द्योतक*

 *-कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील*

          देशातील उसाच्या क्षेत्रापैकी महाराष्ट्र राज्यात ऊसाचे 18 टक्के क्षेत्र असून 32 टक्के उत्पादन आहे. राज्यामध्ये 86 टक्के क्षेत्र हे पाडेगाव संशोधन केंद्राने विकसित केलेल्या वाणांच्याखाली आहे. पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र हे साखर कारखान्यांची, शेतकर्‍यांची आणि कृषि विद्यापीठाची शान आहे. या संशोधन केंद्रातून ऊसाचे आतापर्यंत 17 वाण आणि 110 शिफारशी प्रसारीत करण्यात आलेल्या आहेत. या ऊसाच्या वाणांमुळेच साखर कारखाने सक्षमपणे सुरू आहेत आणि ऊस उत्पादक शेतकर्‍यांची आर्थिक प्रगती झाली आहे. हे सर्व श्रेय ऊस वाण निर्मिती करणार्‍या शास्त्रज्ञांना जाते. ज्या राष्ट्रात शास्त्रज्ञांचा सन्मान होतो त्याच राष्ट्राची प्रगती वेगाने होते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. 

       महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे नव्याने प्रसारीत झालेल्या ऊसाच्या सुधारीत वाणांची तांत्रिक माहिती होण्याकरीता ऊसाच्या सुधारीत वाणांची ओळख या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट कार्यक्रमाचे आयोजन मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे करण्यात आले होते. यावेळी झालेल्या चर्चासत्राच्या कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानावरून कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, पुणे येथील वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे कार्यकारी संचालक श्री. अजित चौगुले, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. जीवाजीराव मोहिते, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नितीन दानवले, पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे आणि पाडेगावचे सरपंच श्री. राहुल कोकरे उपस्थित होते.

           कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील पुढे म्हणाले की, आपण सध्या हवामान बदलास सामोरे जात आहोत. या हवामान बदलाला तग धरणारे असे ऊसाचे वाण फुले ऊस 15012, फुले ऊस 13007 व फुले ऊस 15006 वाण या संशोधन केंद्राने विकसित केले आहेत. हे वाण जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकर्‍यांपर्यंत जाण्यासाठी साखर कारखान्यांचे ऊस विकास अधिकारी, मुख्य शेतकी अधिकारी यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी श्री. अजित चौगुले म्हणाले की, या ऊस संशोधन केंद्राने ऊसावर केलेल्या संशोधनाचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. या संशोधन केंद्राचे बळकटीकरण करण्यासाठी सर्व कारखान्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. डॉ. राजेंद्र सरकाळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सहकारी बँक व साखर कारखाने यांनी सहकाराचे नाते जपल्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा फायदा झालेला आहे. ऊसामध्ये भविष्यात क्रांती होण्याची अपेक्षा पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रामध्ये होत असलेल्या संशोधनातून दिसत आहे. याप्रसंगी डॉ. विठ्ठल शिर्के म्हणाले की फुले 0265 आणि को 86032 या वाणांना समतुल्य वाण फुले ऊस 15012, फुले ऊस 13007 व फुले ऊस 15006 या संशोधन केंद्राने प्रसारीत केले आहे. हे वाण जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत जाण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आधुनिक ऊस उत्पादन तंत्रज्ञान या पुस्तिकेचे आणि ऊस तंत्रज्ञानावर आधारीत दहा घडीपित्रीकेंचे विमोचन करण्यात आले.

         यावेळी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावचे प्रमुख डॉ. राजेंद्र भिलारे यांनी तांत्रिक सत्रामध्ये ऊसाचे नवीन वाण फुले ऊस 15012, फुले ऊस 13007 व फुले ऊस 15006 यांची माहिती दिली. हे वाण फुले 0265 आणि को 86032 या वाणांपेक्षा कसे सरस आहेत हे सांगितले. या प्रसंगी उपस्थितांच्या प्रश्‍नांना पाडेगाव ऊस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी उत्तरे देवून त्यांच्या शंकांचे निरसन केले. डॉ. सुरेश उबाळे, डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके आणि डॉ. सुरज नलावडे यांनी तांत्रिक सत्रामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केले. सकाळच्या सत्रामध्ये साखर कारखान्यांच्या अधिकार्‍यांनी फुले ऊस 15012, फुले ऊस 13007 व फुले ऊस 15006 प्रक्षेत्रांना भेटी दिल्या. भेटी दरम्यान डॉ. दत्तात्रय थोरवे, डॉ. किरणकुमार ओंबासे, श्री. अनिल डुबल व श्री. अंकुश भोसले यांनी कारखान्यांच्या अधिकार्‍यांना माहिती दिली. या चर्चासत्रासाठी महाराष्ट्रातील 60 हून अधिक साखर कारखान्यांचे 100 हून अधिक कार्यकारी संचालक, ऊस विकास अधिकारी आणि शेतकी अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. दत्तात्रय थोरवे यांनी तर आभार डॉ. कैलास काळे यांनी केले.