विद्यापीठ आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत खडांबे येथे शेतकरी व विद्यापीठ शास्त्रज्ञ यांच्यात संवाद .
*विद्यापीठ आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत खडांबे येथे शेतकरी व विद्यापीठ शास्त्रज्ञ यांच्यात संवाद*
*राहुरी विद्यापीठ, दि. 23 फेब्रुवारी, 2024*
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या प्रेरणेने विद्यापीठ आपल्या दारी या अभिनव कार्यक्रमांतर्गत विद्यापीठ मध्यवर्ती परिसरातील विद्यापीठ प्रकल्पग्रस्त सहा गावांतील शेतकर्यांना विद्यापीठाने विकसीत केलेले आधुनिक तंत्रज्ञान कृती प्रात्यक्षिकांद्वारे पुरविण्यात येणार असल्याचे आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. महानंद माने यांनी सांगितले. त्याच अनुषंगाने आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग, शेतकरी शास्रज्ञ मंच या योजनेअंतर्गत मु.पो. खडांबे ब्रु., ता. राहुरी, जि. अहमदनगर येथील शेतकर्यांच्या शेतावर डॉ. महानंद माने यांनी विभागातील सहकार्यांसह भेट देवून शेतकर्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी कृषि भूषण श्री. सुरसींग पवार, प्रगतशील शेतकरी श्री. अशोक थोरात, श्री. गोरक्ष हाडोळे, श्री. प्रसाद केंघे, श्री. सुनिल काचोळे, श्री. विश्वजीत ताकटे गावातील इतर शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. महानंद माने यांनी उपस्थित शेतकर्यांना या उपक्रमाविषयी माहिती दिली. जमिनीच्या आरोग्याविषयी बोलतांना ते म्हणाले की खडांबे गावातील विविध शेतकर्यांच्या शेतातील मातीचे नमुने तपासणी करुन उपलब्ध अन्नद्रव्ये, सामू व विद्युत वाहमता इ. माहिती गोळा करुन जी.आय.एस. तंत्रज्ञानाद्वारे त्याचे नकाशे तयार करणार आहोत. यावेळी त्यांनी जमिनीची क्षारता कमी करण्याविषयी उपाययोजना सुचविल्या व जनिमीतील सेंद्रिय कर्ब कसा वाढविता येईल या विषयी शेतकर्यांबरोबर चर्चा केली. शेती व्यवसायातील येणार्या समस्यांविषयी विद्यापीठाबरोबर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित शेतकर्यांना केले.
यावेळी श्री. सुरसींग पवार यांनी शेती व्यवसाय करतांना वेळेचे महत्व व शेतीच्या जमा खर्चाच्या नोंदी ठेवण्याचे महत्व विषद केले. याप्रसंगी उपस्थित शेतकर्यांनी खते उपलब्ध होण्यात येणार्या अडचणी विशेषतः क्षारयुक्त जमिनीची सुधारणा करण्यासाठी जिप्सम उपलब्ध नसल्याचे सांगितले. सेंद्रिय शेती करतांना ऊस पिकातील पाचट अच्छादनामुळे घोणस जातीच्या विषारी सापाचा वावर अधिक प्रमाणात आढळल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित शेतकर्यांनी विद्यापीठातील ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्रामध्ये ड्रोन पायलट प्रशिक्षण घेण्यासंबंधी उत्सुकता दाखविली. त्याचबरोबर विद्यापीठ परिसरातील सहा गावांच्या शेतकर्यांसाठी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाचे कृषि सहाय्यक श्री. शेषराव देशमुख यांनी केले. श्री. शरद बेल्हेकर यांनी या कार्यक्रामाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.