माळी समाजाच्या नेत्याला मंत्रिपदाची मागणी आमदार उमेश यावलकर यांच्या नावाची जोरदार चर्चा

1.

काटोल:-  वरुड-मोर्शी विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आलेले आणि विदर्भातील माळी समाजाचे एकमेव आमदार असलेल्या उमेश यावलकर यांना मंत्रिपद मिळावे, अशी मागणी विदर्भातील माळी समाजाने केली आहे. माळी समाजाच्या नेतृत्वाला राजकीय मान्यता मिळवून देण्यासाठी हा आग्रह केला जात आहे.

माळी समाज हा विदर्भातील महत्त्वाचा घटक असूनही अनेक वर्षे तो राजकीय दृष्ट्या दुर्लक्षित राहिला आहे. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये माळी समाजाने महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देत मोठ्या प्रमाणावर मतदान केले. विदर्भात महायुतीचे उमेदवार यशस्वी होण्यात माळी समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

वरुड-मोर्शीचे आमदार उमेश यावलकर यांचे समाजकार्य आणि राजकीय योगदान लक्षात घेता, त्यांना मंत्रिपद दिल्यास माळी समाजाच्या विश्वासाला पात्र ठरल्याचे दाखले सरकार देऊ शकेल. माळी समाजाने मोठ्या आशेने भारतीय जनता पक्षाला पाठींबा दिला असून, हा पाठिंबा कायम ठेवण्यासाठी त्यांची मागणी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे अनेक समाजबांधवांचे मत आहे.

उमेश यावलकर यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी माळी समाजातील अनेक व्यक्तींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ई-मेलद्वारे आपली मागणी कळवली आहे. समाजाच्या या डिजिटल मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रत्येक कोपऱ्यातून यावलकर यांच्या मंत्रिपदासाठी पाठिंबा व्यक्त केला जात आहे.

उमेश यावलकर हे केवळ माळी समाजाचेच नव्हे तर विदर्भातील सर्वसामान्य जनतेचेही प्रतिनिधित्व करतात. त्यांना मंत्रिपद दिल्यास समाजाच्या मागण्यांना योग्य न्याय मिळेल आणि विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. विदर्भातील माळी समाजाचा आवाज केंद्रात आणि राज्यात प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी यावलकर यांच्या नेमणुकीला पाठिंबा मिळत आहे.

भाजपाने माळी समाजाच्या विश्वासाला तडा न जाऊ देता त्यांना मंत्रिमंडळात सन्मानाचे स्थान देण्याचा विचार करावा, अशी माळी समाजाची ठाम मागणी आहे.