महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कृषि अर्थशास्त्र विभागाच्या 25 व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन .

*महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये कृषि अर्थशास्त्र विभागाच्या 25 व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कृषि अर्थशास्त्र विभागामार्फत ग्रामीण समृद्धीसाठी नाविन्यपूर्ण संशोधन व उद्योजकता कृषि दृष्टिकोन या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन दि. 27 ते 28 फेब्रुवारी, 2025 या दरम्यान करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या कृषि मूल्य व किंमत आयोगाचे अध्यक्ष डॉ. विजय पॉल शर्मा उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. साताप्पा खरबडे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी परभणी येथील मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमनी मिश्रा, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये कृषि व्यवसाय आणि उद्योजकता विकास, नाविन्यपूर्ण विपणन धोरण, मूल्यवर्धन आणि कृषि प्रक्रिया, हवामान स्मार्ट शेती, कृषि तंत्रज्ञान आणि डिजिटल शेती या विषयाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेमध्ये एकूण पाच सत्रांमध्ये कामकाज पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातील कृषि विद्यापीठे आणि इतर प्रमुख संस्थांमधून सुमारे 500 शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी या परिषदेत सहभागी होणार आहेत. हे प्रतिनिधी विविध विषयांवर आपले संशोधनपर लेख सादर करतील तसेच त्या अनुषंगाने परिषदेमध्ये भविष्यातील संशोधनाचा वेध घेण्यासाठी व्यापक चर्चा होईल. यानिमित्ताने संशोधनपर लेखांवर आधारीत स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र हिले यांनी दिली.