तांभेरे येथे शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत खेत बचाव अभियानांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न .
*तांभेरे येथे शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत खेत बचाव अभियानांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न*

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या नेतृत्वाखाली आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विद्यापीठांतर्गत नवी दिल्लीस्थित भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा शेतकरी प्रथम प्रकल्प राबविला जात आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शेतकरी प्रथम प्रकल्प व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खेत बचाव अभियान आणि संतुलीत खत वापर जागृकता अभियानांतर्गत एक दिवसीय सोयाबीन व तूर उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माती परीक्षण व पीक परीक्षा प्रकल्पाचे मृदा रसायन शास्त्रज्ञ डॉ. आनंद जाधव होते. याप्रसंगी व्यासपीठावर तांभेरे गावचे सरपंच डॉ. उमेश मुसमाडे, प्रसारण केंद्र प्रमुख तथा शेतकरी प्रथम प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सचिन सदाफळ, प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. भगवान देशमुख, कसबे डिग्रज, जि. सांगली येथील कृषी संशोधन केंद्राचे वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. सचिन महाजन, कडधान्य सुधार प्रकल्पाचे वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. नारायण मुसमाडे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेश भारती, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे विषय विशेषज्ञ प्रा. अन्सारखान आत्तार, वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. तृष्णा कातोरे, मंडळ कृषि अधिकारी भारत कातोरे, सहाय्यक कृषि अधिकारी प्रतिक ठाकरे व प्रगतशील शेतकरी मेजर ताराचंद गागरे उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. आनंद जाधव म्हणाले की माती हा उत्पादनाचा पाया आहे. मातीची सुपीकता टिकविण्यासाठी आणि उत्पादकता वाढविण्यासाठी सेंद्रिय, जैविक व हिरवळीच्या खतांचा जास्तीत जास्त वापर करावा. यामुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढून जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढेल. कर्ब हा जमिनीचा गर्भ असल्यामुळे जमिनीतील कर्ब वाढविणे गरजेचे आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी माती परिक्षण करुनच संतुलीत रासायनीक खतांची मात्रा टाकावी. याप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक करतांना डॉ. सचिन सदाफळ म्हणाले मा. कुलगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी प्रथम प्रकल्पाद्वारे कृषि तंत्रज्ञान घरोघरी, समृध्दी येईल गावोगावी या संकल्पनेंतर्गत खेत बचाव अभियान आणि संतुलीत खत वापर जागृकता अभियानाद्वारे विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. शेतकर्यांनी या अभियानात सहभागी होवून या खरीप हंगामात संतुलीत खतांचा वापर करावा.
याप्रसंगी तांत्रिक मार्गदर्शनामध्ये डॉ. सचिन महाजन यांनी सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान, डॉ. नारायण मुसमाडे यांनी बीज प्रक्रिया, डॉ. महेश भारती यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन व डॉ. तृष्णा कातोरे यांनी तूर उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते खेत बचाव अभियान आणि संतुलीत खत वापर जागृकता अभियान-2026 या माहितीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेतकरी प्रथम प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहयोगी श्री. विजय शेडगे यांनी केले तर आभार डॉ. भगवान देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रक्षेत्र सहाय्यक श्री. किरण मगर व श्री. राहुल कोर्हाळे यांनी परिश्रम घेतले. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये चिंचविहिरे, कणगर, तांभेरे व कानडगावातील 100 हुन अधिक शेतकरी उपस्थित होते.








