कौठा गावच्या मनीषा वैरागरची कारागृह पोलीस निवड जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाचे फळ; पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव

कौठा गावच्या मनीषा वैरागरची कारागृह पोलीस निवड  जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाचे फळ; पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव

कौठा गावच्या मनीषा वैरागरची कारागृह पोलीस निवड

जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाचे फळ; पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव

चांदा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील कौठा गावची सुकन्या मनीषा रतन वैरागर हिने महाराष्ट्र शासनाच्या नुकत्याच पार पडलेल्या भरती प्रक्रियेत यश मिळवत पुणे सिटी कारागृह येथे कारागृह पोलीस पदावर निवड मिळविली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे कौवठा गावासह संपूर्ण पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतून शिक्षण घेत असताना जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर मनीषाने हे यश संपादन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तिचे यश प्रेरणादायी ठरत असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी तिने आदर्श निर्माण केला आहे.मनीषाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कौवठा येथील राजे संभाजी माध्यमिक विद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण जवाहर माध्यमिक विद्यालय, चांदा येथे घेतले. पुढे सोनई येथील महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण करताना तिने एनसीसीचेही प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.

स्पर्धा परीक्षेचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तिने अहिल्यानगर येथील शिवरक्षक करियर अकॅडमीमध्ये सलग तीन ते चार वर्षे मेहनत घेतली. नियमित अभ्यास, शारीरिक तयारी आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर तिने महाराष्ट्र शासनाच्या भरती प्रक्रियेत यश मिळवत पुणे कारागृह पोलीस पदावर निवड मिळवली.मनीषाच्या यशाबद्दल गावातील नागरिक, शिक्षक, मित्रपरिवार शिवरक्षक करिअर अकॅडमी अहिल्यानगर चे राजे पवार सर. दरेकर सर. माठीक सर तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण भागातील मुलींनीही मोठी स्वप्ने पाहून सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, याचे जिवंत उदाहरण म्हणून मनीषा वैरागरकडे पाहिले जात आहे.