कृषि विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना मोठा लाभ आ. दिलीप बोरसे

कृषि विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना मोठा लाभ आ. दिलीप बोरसे

*कृषि विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा शेतकर्यांना मोठा लाभ*

*- आ. दिलीप बोरसे*

          सात्रळ व वडनेर येथील पन्हाळे बंधूंनी राहुरी कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान वापरल्यामुळे त्यांच्या डाळिंब बागा उत्कृष्ट उत्पादन देत आहेत. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन उच्च दर्जाचे असून शेतकर्यांना त्याचा मोठा लाभ होत आहे असे प्रतिपादन आ. दिलीप बोरसे यांनी केले.

           अहिल्यानगर येथे विधानमंडळ कामकाज समितीच्या अंदाज समितीची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान बैठकीतील सदस्यांनी विद्यापीठाच्या संशोधनाचा परिणाम शेतकर्यांच्या प्रक्षेत्रावर बघण्याचे नियोजन करण्यास सांगितले. या बैठकीदरम्यान महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्या संशोधन व तंत्रज्ञानाचा शेतकर्यांपर्यंत कितपत प्रसार झाला आहे याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ठरविलेल्या प्रक्षेत्र भेटीनुसार आ. दिलीप बोरसे आणि आ. काशिनाथ पवार व समिती सदस्यांनी सात्रळ व वडनेर येथील संतोष पन्हाळे, श्रीकांत पन्हाळे व शशिकांत पन्हाळे यांच्या डाळिंब बागेला भेट दिली. या प्रक्षेत्र भेटीवेळी आ. दिलीप बोरसे बोलत होते. अहिल्यानगर येथे झालेल्या बैठकीप्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील, नियंत्रक डॉ. सचिन नांदगुडे उपस्थित होते.

           याप्रसंगी सादरीकरण करताना डॉ. प्रशांत बोडके म्हणाले की, विद्यापीठ एकूण 128 पिकांवर संशोधन करत असून आजपर्यंत 320 वाण, 2000 तंत्रज्ञान शिफारसी, 56 कृषि अवजारे व यंत्रे, 11 पेटंट्स, 110 शेतकरी पीपीव्ही एफ आर ए वाण व 62 वेब अॅप तंत्रज्ञान विकसित केले आहे. ही सर्व तंत्रज्ञाने शेतकर्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचली असून त्यांचा अवलंब केल्याने अनेक शेतकर्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. यावेळी समितीसमोर ऊस, डाळिंब, भात, गहू, हरभरा आदी महत्त्वाच्या पिकांचा अभ्यास मांडण्यात आला. उसाच्या 86032 व 265 या वाणांनी राज्यातील सुमारे 90 टक्के क्षेत्र व्यापले असून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत सुमारे 4,98,421 कोटी रुपयांची भर घातली आहे, तर शेतकर्यांना 53,428 कोटी रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे. तसेच सुपर भगवा हा डाळिंबाचा वाण राज्यातच नव्हे तर देशातील 60 ते 70 टक्के क्षेत्रावर लागवडीत असून त्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहे.

             डॉ. प्रशांत बोडके हे आ. दिलीप बोरसे आणि आ. काशिनाथ पवार व समिती सदस्यांना सात्रळ व वडनेर येथील पन्हाळे बंधूंच्या डाळिंब बागेला प्रक्षेत्र भेटीसाठी घेऊन गेले. या प्रक्षेत्रभेटीत विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेतकर्यांनी डाळिंब बागेचे उत्कृष्ट व्यवस्थापन केले असल्याचे आढळले. विशेषतः तेलकट डाग व मर या रोगांच्या व्यवस्थापनासाठी कृषि विद्यापीठ विकसित तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून उत्पादनात लक्षणीय वाढ साध्य केली आहे. तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण व जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचीही माहिती देण्यात आली. यावेळी आ. बोरसे यांनी पन्हाळे बंधूंच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाचे कौतुक करून त्यांच्या नावाची उद्यान पंडित पुरस्कारासाठी शिफारस करण्याचे आश्वासन दिले. तसेच विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाबद्दल समाधान व्यक्त करत कुलगुरू डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके व संपूर्ण संशोधन पथकाचे अभिनंदन केले.

         

         याप्रसंगी समितीच्या सदस्यांनी डाळिंब बागेतच श्री. संतोष पन्हाळे व श्री. शशिकांत पन्हाळे यांचा सत्कार केला. नाशिक जिल्ह्यातील सटाणा व इतर भागात तंत्रज्ञान प्रसारासाठी विशेष कार्यक्रम राबवण्याबाबतही आमदारांनी सकारात्मक भूमिका दर्शवली. या भेटीचे नियोजन संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी केले. त्यांनी समितीसमोर विविध तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती मांडली. मा. आमदारांनी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत विद्यापीठाला अधिक निधी उपलब्ध करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनाला चालना देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी कोरडवाहू फळे संशोधन केंद्राचे डॉ. प्रकाश मोरे, डॉ. सुवर्णा देवरे व डॉ. अजय हजारे हे शास्त्रज्ञ उपस्थित होते.