52 वर्ष झाले जमिनी देऊन 'विद्यापीठाला' केला काय गुन्हा,प्रकल्पग्रस्ताचा कागद हातात नोकरीत सामावून का घेईना.
राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे सध्या वेगवेगळ्या कारणांनी गाजत आहे.त्यातच राहुरी येथील प्रकल्पग्रस्त कृती समितीने बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ स्थापन झाले त्यावेळी राहुरीत पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या जमिनी विद्यापीठाने ताब्यात घेतल्या होत्या त्याबदल्यात या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी मिळावी ही अपेक्षा होती परंतु 52 वर्षे होऊनही या शेतकऱ्यांची मुले हातात प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखला घेऊन फिरत आहेत परंतु त्यांना आजतागायत विद्यापीठांमध्ये नोकरी मिळालेली नाही.नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे तसेच आंदोलनही केले आहे .मंत्रालयात बैठकाही झाल्या आहेत परंतु त्यांना कोणत्याच प्रकारे न्याय मिळालेला नाही म्हणून प्रकल्पग्रस्त कृती समिती अध्यक्ष संतोष पानसंबळ, उपाध्यक्ष विजय शेडगे, सचिव सम्राट लांडगे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिनांक 14/03/2022पासून बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
विद्यापीठाने ताब्यात घेतलेल्या जमिनीच्या बदल्यात काही शेतकऱ्यांना कोणताही मोबदला मिळालेला नाही आणि काहींना फक्त प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखला मिळाला आहे त्यांनाही नोकरीत सामावून घेतले नाही .ज्यांच्या हातात प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखला आहे त्यांची नोकरीसाठीची वयोमर्यादा संपत आलेली आहे तर काहींची संपली आहे त्यामुळे दाखला हस्तांतरणाची वेळ त्यांच्यावर आली आहे.त्यामुळे उर्वरित प्रकल्पग्रस्तांना तात्काळ विद्यापीठसेवेत सामावून घ्यावे असे प्रकल्पग्रस्तांचे मत आहे.
.