माननीय श्री. रवींद्र थोरात यांना आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार तर श्री.अनिल कल्हापुरे आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित.
पंचायत समिती राहुरी यांच्या वतीने गुणवंत कर्मचारी पुरस्कार वितरण समारंभ महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे डॉक्टर सौ. उषाताई तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला आहे.या कार्यक्रमाप्रसंगी सडे आणि देसवंडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री रवींद्र थोरात यांना राहुरी पंचायत समितीचा आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच पिंपरी अवघड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील श्री अनिल कल्हापुरे यांना आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती सौ. बेबीताई सोडनर व उप सभापती श्री. प्रदीप पवार यांच्या सहअनेक मान्यवर उपस्थित होते.
मा. श्री. रवींद्र थोरात हे गेल्या पंचवीस वर्षांपासून सेवेत कार्यरत आहेत. झरा जसा गोड पाण्याने सर्वांची तृष्णा पूर्ण करतो तसेच प्रशासन चालवताना कोणताही शिक्षक व मुख्याध्यापक असो त्यांना येणारी अडचण प्रेमाने सोडवण्याचे काम ते सहज करतात.प्रशासन चालवताना त्यांनी धाक दडपशाहीचा वापर कधीही केला नाही.शिक्षकांच्या मनात आदरयुक्त स्थान असणारे श्री. रवींद्र थोरात यांची या पुरस्कारासाठी निवड करून पंचायत समितीने पुरस्काराची उंची नक्कीच वाढवलेली आहे.
पिंप्री अवघड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहकारी शिक्षक श्री.अनिल कल्हापुरे सर खरोखरच एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. कितीही कामाचा प्रशासकीय व्याप असो त्यांच्या चेहऱ्यावर कधीच त्रासिक भावना दिसत नाही. आपल्या सहकाऱ्यांना घेऊन कोणत्याही संकटावर यशस्वी मार्ग काढण्यात सरांचा हातखंडा आहे. जीवनात मित्र जोडण्यात आणि त्यांच्या सुख-दुःखाच्या प्रसंगी आवर्जून मदत करणारे कल्हापुरे सर म्हणजे प्रेमळ व्यक्तिमत्त्व आहे. एवढेच नाही तर आपला वर्ग अतिशय चांगल्या पद्धतीने घडविण्यात सर सतत अग्रेसर असतात.केंद्रातील सहकारी शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याकडून माहिती घेताना अनेकदा सकारात्मक प्रतिसाद मिळवण्याचे कसब सरांकडे आहे. सडे केंद्राचा प्रतिनिधी म्हणून आदर्श गुणवंत पुरस्काराने सन्मान होणे ही आम्हा शिक्षकांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे असे मत श्री. शिवाजी नवले सर सहाय्यक केंद्रप्रमुख सडे यांनी bps live चे जिल्हा पत्रकार कृष्णा गायकवाड यांच्याशी बोलतांना सांगितले आहे.