बाळ येशू चर्च, बाभळेश्वर व स्व. दादाभाऊ भोसले प्रतिष्ठान, संगमनेर(कोंची) यांच्या संयुक्त विद्यमाने बाभळेश्वरच्या बाळ येशू चर्च मध्ये 12 मे रोजी 148 व्या मोफत ख्रिस्ती वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते.
श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) :- बाळ येशू चर्च, बाभळेश्वर व स्व. दादाभाऊ भोसले प्रतिष्ठान, संगमनेर(कोंची) यांच्या संयुक्त विद्यमाने बाभळेश्वरच्या बाळ येशू चर्च मध्ये 12 मे रोजी 148 व्या मोफत ख्रिस्ती वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते, या कौटुंबिक उपक्रमाचे उदघाटन प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फादर अब्राहाम रणनवरे यांच्या शुभ हस्ते झाले.
उदघाटन प्रसंगी रेव्ह. फादर रणनवरे म्हणाले की, विवाह जुळवून घेताना मुला-मुलींनी आईवडिलांची मक्तेदारी बाजूला ठेवून स्वतःच्या पसंतीला अधिक महत्व द्यावे. उपस्थितांना मार्गदर्शन करताना सेवानिवृत्त प्राचार्य श्री प्रभाकर लोखंडे म्हणाले की, पालकांनी वधू-वर मेळाव्यातील एकत्रिकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक एकनिष्ठता जपली पाहिजे. विवाहा नन्तर येणाऱ्या कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी न्यायालयात न जाता धार्मिक व सामाजिक पातळीवरच सोडवाव्यात असे महत्वपूर्ण आवाहन ऍड. श्री. प्रमोद सगळगीळे यांनी उपस्थितांना केले. यावेळी बोधक गुरुजी, सुधाकर बनसोडे, बाळासाहेब ब्राम्हणे व रमेश क्षीरसागर यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रकाश लोखंडे यांनी प्रास्ताविक सादर केले तर संयोजक श्रीधर भोसले यांनी सम्पूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. 12 मे रोजी जागतिक मातृदिन असल्याने रेव्ह. फादर रणनवरे यांनी मेळाव्यातील उपस्थित मातांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान केला.
समाजातीची मागणी असल्याने मोफत ख्रिस्ती वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन श्रीधर भोसले हे त्यांचे प्रतिष्ठान मार्फत एक सामाजिक बांधिलकी म्हणून करत आहेत. यापुर्वी राहुरी येथील फातिमा माता चर्च राहुरी येथे १४७ वा वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी पुष्कळ पालक व वधू-वर या मेळाव्यात सहभागी होऊन उस्फुर्त प्रतीसाद दिला होता.