फाल्गुन वद्य एकादशी निमित्त श्रीक्षेत्र ज्ञानेश्वर मंदिर संस्थान नेवासा येथे महंत रामगिरीजी महाराज यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.
" परिमलाची धाव भ्रमर ओढी
तैसी तुझी गोडी लागो
अवीट गे माय माये विटेना
तृषा लागली......
मनाचा स्वभाव भ्रमराप्रमाणे गुंतण्याचा आहे. मन विषयात गुंतून राहते. या मनाला स्थिर करण्यासाठी एकादशी व सोमवारी उपवास करायचा असतो. आजची पापमोचनी एकादशी व सोमवार एकाच दिवशी आले आहेत. वारकरी शिव व विष्णू यांच्यात भेद मानत नाहीत.परमात्मा एकच आहे त्यामुळे कट्टरवाद नसावा. देव तेहतीस कोटी आहेत म्हणजे तेहतीस प्रकारचे देव आहेत. " श्रीक्षेत्र सरालाबेटाचे पूजनीय महंत रामगिरी महाराज कीर्तनात सांगत होते.
नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिरात पापमोचनी एकादशी निमित्ताने आयोजित केलेल्या कीर्तन सोहळ्यात बोलताना पूजनीय रामगिरी महाराज म्हणाले , " कीर्तन हे भगवंत प्राप्तीचे साधन आहे. भक्ताचे व भगवंताचे नैसर्गिक प्रेम असते तर संसारातील प्रेम गरजेपोटी, स्वार्थी, कृत्रिम आहे. परमार्थ निष्टेचा असावा. निसटानिसटीचा नसावा. परमार्थात अनुकुलता-प्रतिकुलता येत असते पण भगवंतावर दृढ विश्वास हवा. ज्याप्रमाणे भ्रमराला सुगंधाची गोडी आहे त्याप्रमाणे भगवंता मला तुझी गोडी लागो. ज्ञानेश्वर, तुकारामादि संतांनी भक्तीचा आनंद एकट्याने घेतला नाही तर तो समाजाला वाटून दिला. भ्रमर कमळावर प्रेम करतो हे खरे आहे पण तो लाकडालाही विनाकारण कोरत बसतो.त्यामुळे या ठिकाणी भ्रमराची उपमा जरा कमी पडते. जीवरुपी भ्रमर देखील अकारण विषयाच्या मागे लागतो. लक्षात घ्या, विषयभोगाला वीट आहे पण भक्ती अवीट आहे. भगवंताला विसरू नका. अखंड नामस्मरण केले तरच आपलं भलं होणार आहे "
या प्रसंगी ज्ञानेश्वर संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंगजी अभंग, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, हभप शिवाजी महाराज देशमुख, हभप नंदकिशोर महाराज खरात, विश्वस्त कैलासराव जाधव, हभप ज्ञानेश्वर महाराज शिंदे माऊली, हभप मधू महाराज कडलग, हभप दत्ता महाराज बहिरट, व हजारो भाविक उपस्थित होते.