बीपीएस न्यूज मराठी 14/12/2021

दि : 14.12.2021
मंगळवार

★★ :    रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास रशियाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि आर्थिक आघाडीवर अनेक दुष्परिणाम सहन करावे लागतील, असा इशारा आपण रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना दिल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रविवारी पत्रकारांना दिली. 

★★ :   प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी पाच मध्य आशियातील देशांचे नेते भारतात पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कझाकिस्तान  किर्गिस्तान , ताजिकिस्तान , तुर्कमेनिस्तान  आणि उझबेकिस्तान  या देशांचे नेते प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी भारतात पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

★★ :    दुबईनं जगातलं पहिलं-वहिलं 'पेपरलेस सरकार' होण्याचा मान मिळवलाय. संयक्त अरब अमिरातचे राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी हा घोषणा केलीय.दुबई सरकारच्या या निर्णयामुळे १.३ अरब दिरहम (३५ कोटी डॉलर) आणि एक कोटी ४० लाख श्रमांच्या तासाची बचत होणार आहे.यापुढे दुबईमधील सर्व सरकारी कामं डिजिटल पद्धतीनंच पार पडतील. दुबई सरकारमधील सर्व अंतर्गत, बाह्य व्यवहार आणि प्रक्रिया आता १०० टक्के डिजिटल पद्धतीनं होतील. तसंच या सर्व सेवा व्यापक डिजिटल सरकारी सेवा प्लॅटफॉर्मद्वारे व्यवस्थापित केल्या जातील.

★★ :    पाकिस्तानच्या कह्यात असणारे सिंध आणि बलुचिस्तान यांना स्वतंत्र करा, अशी मागणी पाकमधील राजकीय पक्ष मुत्ताहिदा कौमी मूवमेंटचे (एम्.क्यू.एम्.चे) अध्यक्ष अल्ताफ हुसेन यांनी संयुक्त राष्ट्रे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय संसद आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. अल्ताफ हुसेन यांच्यावर पाकमध्ये शेकडो गुन्हे नोंद असल्याने ते अनेक वर्षांपासून लंडनमध्ये रहात आहेत.

★★ :   जगात ओमिक्रॉनमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या रुग्णांची नोंद झाली आहे. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली आहे. 

★★ :    श्रीनगरमधील  झेवन  परिसरात दहशतवाद्यांनी जवानांच्या  ताफ्यावर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात १४ जवान जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. तर ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

★★ :   वाराणसीतील श्रीकाशी विश्वनाथ धामचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकार्पण केलं.  श्रीकाशी विश्वनाथ धामचा तब्बल २४४ वर्षां नंतर जीर्णोद्धार करण्यात आला आहे.  शिव आणि त्यांची लाडकी उत्तरवाहिनी गंगा यांना एकमेकांशी जोडणाऱ्या श्रीकाशी विश्वनाथ धामची भव्यता सध्या पाहायला मिळत आहे. धामचा मंदिर चौरस परिसर आता इतका विस्तीर्ण झाला आहे की येथे २ लाख भाविक उभे राहून पूजा करू शकतील.

★★ :    पंतप्रधान मोदींनी वाराणसीत दुपारी १ वाजेच्या सुमारास काशी विश्वेश्वराची पूजा केली. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण देशातील अनेक ठिकाणी करण्यात आले. यानंतर पंतप्रधान मोदींनी काशी विश्वनाथ कॉरिडोर साठी काम करणाऱ्या मजुरांचा गौरव केला.काशी विश्वेश्वराच्या पूजे नंतर पंतप्रधान मोदींनी काशी विश्वनाथ धामचे (कॉरिडोर) लोकार्पण केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी संवाद साधला.  काशी विश्वनाथ कॉरिडोरसाठी जागा देणाऱ्या काशीतील जनतेचे, उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या टीमचे पंतप्रधान मोदींनी यावेळी अभिनंदन केले.  काशी विश्वानाथ मंदिराचा परिसर पूर्वी खूप छोटा होता. पण आता काशीतील जनतेच्या पुढाकाराने आता हजारो भाविक थेट गंगा स्नान करून काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊ शकतील. दिव्यांग व्यक्तींनाही काशी विश्वनाथाचे दर्शन घेणं सुलभ होणार आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

★★ :    प्रयागराज मध्ये एक अनोख प्रकरण समोर आलंय. येथे नदी नाल्यांखाली वाहत असल्याचे पुरावे सापडलेत. हेलिकॉप्टरमधून केलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्वेक्षणात ही बाब समोर आलीय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून, त्याचा भविष्यात मोठा उपयोग होऊ शकतो, असा अंदाजही व्यक्त केला जातोय. अॅडव्हान्स्ड अर्थ अॅण्ड स्पेस सायन्स  या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून असं समोर आलंय, की प्रयागराजमध्ये सध्या गंगा-यमुना संगमाखाली एक प्राचीन नदी सापडलीय.CSIR-NGRI च्या शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे हा अभ्यास केलाय. ही नदी हिमालयाशी संबंधित असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं ही तिसरी नदी सरस्वती  असू शकते. या संगमला 3 नद्यांचं मिलन असंही म्हणतात, परंतु सध्या सरस्वती नदी वैज्ञानिकदृष्ट्या कोरडी पडलीय. अशा स्थितीत संगमाच्या खाली तिसरी नदी सापडणं आश्चर्यकारक मानलं जातंय.

★★ :   नागालँडच्या मोन जिल्ह्यात लष्कराच्या पॅरा स्पेशल फोर्सने केलेल्या कारवाईत 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या एका आठवड्या नंतर, पीडितांच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी निर्णय घेतला आहे की, जोपर्यंत लष्कराच्या आरोपी जवानांना न्यायाच्या कक्षेत आणले जात नाही, जोपर्यंत अंमलबजावणीची कारवाई होत नाही आणि वादग्रस्त सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा रद्द होत नाही तोपर्यंत सरकारी नुकसान भरपाई घेणार नाही.

★★ :   सक्तवसुली संचालनालयाने उत्तर प्रदेशातील माजी खासदार आणि गँगस्टर अतीक अहमद आणि त्याच्या पत्नीवर मोठी कारवाई करत त्यांची ८.१४ कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जवळ आली असतानाच अतीक अहमद या 'बाहुबली' नेत्याला दणका देण्यात आल्याने इतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नेते हादरले आहेत. 

★★ :   ममता बॅनर्जी या आक्रमकपणे गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत उतरल्या आहेत. तृणमूल काँग्रेस गोव्यात सर्व 40 जागा लढवणार आहे. ममता आता गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी ममता या मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांची भेट घेतली होती. यानंतर दोनच आठवड्यात त्यांनी पवार आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गोव्यातील एकमेव आमदार चर्चिल अलेमाव  यांना त्यांनी फोडले आहे. अलेमाव यांनी आज विधानसभा अध्यक्षांकडे राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे तृणमूलमध्ये विलिनीकरण करावे, असे पत्र दिले. अलेमाव हे बेनोलिम मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांचा ममतांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश होणार आहे. अलेमाव हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या तृणमूल प्रवेशाने गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे.

★★ :   भारताच्या हरनाज संधूने जगातील अत्यंत प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धा 'मिस युनिव्हर्स २०२१' चा किताब आपल्या नावे केला आहे. यंदा ७० वी 'मिस युनिव्हर्स' सौंदर्यस्पर्धा इस्त्राइलमध्ये पार पडली. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात ७५ हून अधिक सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.

★★ :    गृहमंत्री दिलीप वळसे पाटील  यांच्या खासगी सचिवाच्या गाडीतून पैसे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाबासाहेब शिंदे यांच्या कारमधून 50 हजार रुपयांची चोरी झाली. याशिवाय काही महत्त्वाची कागदपत्रेही चोरीला गेल्याचा आरोप आहे. सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये  लग्न सोहळ्या साठी गेलेले असताना हा प्रकार घडला.बाबासाहेब शिंदे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. 

★★ :   १९५८ मध्ये नागपूर येथे स्थापन झालेल्या केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे मुख्यालय दिल्लीला हलवले. नागपुरातून हे मुख्यालय दिल्लीला हलवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध   काँग्रेसने  केला आहे. 

★★ :    काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांचा गडचिरोलीदौरा अचानकपणे स्थगित करण्यात आलेला आहे . गेल्या आठवडाभरा पासून प्रियांका गांधी येणार म्हणून कार्यकर्त्यां मध्ये मोठा उत्साह संचारला होता. स्वत: मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार जातीने या दौऱ्याच्या नियोजना साठी झटत होते.

★★ :   औरंगाबादेतील महापालिकेच्या निवडणुका या तोंडावर आल्या आहेत. या दरम्यान मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. हा मुद्दा धरुनच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल यांनी राज्य सरकारला एक ऑफर दिली आहे. सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण दिले तर आम्ही राज्यभरात कोणत्याही ठिकाणी महापालिका निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा जलिल यांनी केली आहे. 

★★ :  आज सेन्सेक्स मध्ये ६५० अंकाची घसरण झाली असून तो सध्या ५८१४० अंकावर आहे. निफ्टीमध्ये १४७ अंकाची घसरण झाली असून तो १७३६३ अंकावर आहे. 

★★ :   दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सर्वच भारतीय खेळाडू सराव करत आहेत. परंतु सरावा दरम्यान हिटमॅन रोहित शर्माच्या हाताला लागलं असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे.

                ●=●=●=●=●=●

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज   काशी विश्वनाथ धाम कॉरिडोरचे लोकार्पण केले .  गेल्या अडीच वर्षांपासून या मंदिराच्या पुर्नेनिर्माणाचे काम सुरू होते. विश्वनाथ मंदिर परिसर हा गंगेच्या किनाऱ्यापर्यंत पसरलेला आहे. काशीमध्ये आल्यावर बाबा विश्वनाथ यांच्या दर्शनाआधी गंगा स्नान करत आचमन करण्याची मान्यता आहे. मात्र आता भाविकांना गंगाजल घेऊन थेट विश्वनाथाचे दर्शन करता येणार आहे.

काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास
वाराणसीतील या काशी विश्ननाथ मंदिराच्या निर्माण आणि पुर्नेनिर्माणाबाबत भाविकांच्या वेगवेगळ्या धारणा आहेत. इतिहासाकारांच्या मते विश्वनाथ मंदिर अकबराच्या दरबारातील नऊ रत्नांपैंकी एक रत्न असलेल्या राजा टोडरमल याने उभारले होते. टोडरमलने विश्वनाथ मंदिराबरोबरच अनेक वेगवेगळ्या वास्तूही उभारल्या .पण त्याने हे काम अकबराच्या आदेशावर केले याचा मात्र कुठलाही पुरावा नाही. त्याला कारणही तसेच आहे. अकबराच्या दरबारात टोडरमलचे स्थान इतके उच्च होते की त्याला कुठलाही निर्णय घेण्यासाठी अकबराच्या आदेशाची  परवानगीची  गरज नव्हती.

असं म्हटलं जात की जवळजवळ शंभर वर्षांनंतर औरंगजेबाने हे मंदिर उद्धवस्त केले. त्यानंतर तब्बल १२५ वर्ष या स्थानावर विश्वनाथ मंदिर नव्हते. नंतर महाराणी अहिल्याबाई यांनी काशी विश्वनाथ मंदिराचे पुर्ननिर्माण केले. त्यानंतर आता २८६ वर्षां नंतर या मंदिराचा कायापालट करण्यात आला आहे. २,००० क्षेत्रफळावर विस्तारलेल्या या मंदिरात विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना अरुंद गल्ल्यां मधून यावे लागत होते. मात्र आता निर्माण करण्यात आलेल्या भव्य दिव्य कॉरीडोरच्या लोकापर्णा नंतर भाविकांना विश्वनाथाचे दर्शन घेणे सुलभ होणार आहे.

काशी विश्वनाथ मंदिराचे महत्व

अशी आख्यायिका आहे की काशी ही भगवान शिवाच्या त्रिशूलाच्या टोकावर वसलेली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण येथे विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी येतात. पवित्र शहरांच्या यादीत काशीचे नाव आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की भगवान विश्ननाथ येथे ब्रम्हांडच्या स्वामींच्या रुपात वास्तव्य करतात. काशी हे शिव आणि पार्वतीचे आवडते स्थान असून येथील विश्वनाथ मंदिर हे शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. गंगा नदीच्या पश्चिमेकडील घाटावर हे मंदिर आहे. तसेच पैराणिक कथांनुसार काशीतील बाबा विश्वनाथाच्या दर्शनामुळे पापमुक्ती मिळते. तर मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो.