म . फु . कृ .विद्यापीठात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी, कुणावर अन्याय करू नका व स्वतःवरही होऊ देऊ नका -सहयोगी अधिष्ठाता डॉ.दिलीप पवार .
*महात्मा फुले कृषि विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*
*कुणावर अन्याय करू नका व स्वतःवरही अन्याय होऊ देऊ नका- सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार*
*राहुरी विद्यापीठ, दि. 14 एप्रिल, 2023*
जगात प्रभावशाली आणि विद्वान व्यक्ती म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख आहे. आपला देश विविधतेने नटलेला आहे. या विविधतेमध्ये एकात्मता कशी राहील याचा अभ्यास करून त्यांनी संविधान लिहिले. ज्ञान हीच ताकद असल्याने सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला. कुणावर अन्याय करू नका व स्वतःवरही अन्याय होऊ देऊ नका अशी शिकवण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली असे प्रतिपादन डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील संचालक, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन येथील डॉ. नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. दिलीप पवार हे बोलत होते. याप्रसंगी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान, प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. पंडित खर्डे, वनस्पती रोगशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अण्णासाहेब नवले, हळगाव कृषी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. प्रेरणा भोसले व विद्यार्थी प्रतिनिधी श्री. मयुरेश तावरे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी डॉ. महावीरसिंग चौहान म्हणाले की थोर पुरुषांचा विचार आत्मसात करुन तो आचरणात आणावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रज्ञा, शिल व करुणा यांचे आचरण करण्याचे सांगितले. प्रत्येकाने जीवनात ही त्रिसुत्री जर वापरली तर प्रत्येक समाज ज्ञानशिल संपन्न होऊन देश महासत्ता होईल. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील विविध कविता सादर केल्या. डॉ. विजू अमोलिक आपल्या भाषणात म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या व्यक्ती नसुन विचार आहेत. त्यांना जातीमध्ये, धर्मामध्ये बांधुन न ठेवता त्यांचे विचार आत्मसात करा व आपल्या जीवनाची यशस्वी वाटचाल करा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समता, बंधुता व स्वातंत्र्य हा विचार पुढे घेवून चला.
याप्रसंगी अंगद लाटे, अजय सदार, अभिषेक वाघ, अभिषेक पाटील या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीचे आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. संध्या सावंत यांनी तर आभार मयुरेश तावरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी व पदव्युत्तर महाविद्यालय, हळगांव कृषि महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.