नगर–मनमाड रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम; बाभळेश्वर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट
नगर–मनमाड रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम; बाभळेश्वर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट
प्रतिनिधी : प्रसाद घोगरे - ९३७०३२८९४४.
बाभळेश्वर - नगर–मनमाड महामार्गावरील रस्त्याचे आणि साईड गटारांचे काम गेली अनेक वर्षे प्रलंबित असून आता सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. बाभळेश्वर येथे सध्या सुरू असलेल्या साईड गटारांच्या बांधकामात प्रचंड अनियमितता आणि निष्काळजीपणा दिसत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, साईड गटारांची सेंट्रिंग उभी असताना कोणताही पीचींग किंवा प्री-लेव्हलिंग न करता थेट मातीवर सिमेंट–वाळूचे मिश्रण ओतले जात आहे. अशा प्रकारचे बेस नसलेले काम काही महिन्यांतच उध्वस्त होऊ शकते, असे स्थानिक बांधकाम जाणकारांचे म्हणणे आहे. नागरिकांचा आरोप आहे की या सर्व प्रक्रियेत सरळसरळ भ्रष्टाचार होत असून सरकारी निधीचा उघड उघड दुरुपयोग केला जात आहे.
कामाच्या दरम्यान कोणताही PWD किंवा संबंधित विभागाचा अधिकारी घटनास्थळी हजर नसल्याचेही स्थानिकांनी सांगितले. सदरील “काम कंत्राटदार आणि मजुरांच्या भरवशावर सोडण्यात आले असून सरकार आणि जनतेची लूट सुरू आहे,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.
दरम्यान, परिसरात “हे काम लक्ष्मी दर्शनाने तर सुरू नाही ना?” अशी चर्चा देखील रंगू लागली आहे. कोणतीही देखरेख, तांत्रिक तपासणी किंवा गुणवत्ता नियंत्रण न करताच काम रेटले जात असल्याने लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
नगर - मनमाड रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की,
“इतक्या वर्षांनी काम सुरू झालं तरी ते या पद्धतीने निकृष्ट दर्जाचं केले जाणार असेल, तर जबाबदारी कोण घेणार? दोषींवर कारवाई होणार का? कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली जाणार का?”
स्थानिक नागरिकांनी संबंधित विभाग, PWD, जिल्हा प्रशासन यांनी तातडीने या कामाची चौकशी करावी, गुणवत्तेचे तांत्रिक परीक्षण करावे आणि दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांनी इशारा दिला आहे की, रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तातडीने सुधारली नाही, तर हा मुद्दा स्थानिक आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, मुख्यमंत्री तसेच केंद्राचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री यांच्याकडे तक्रार करणार असून, आवश्यक असल्यास जबाबदार विभागाविरोधात व कंत्राटदाराच्या भ्रष्टाचाराविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याची तयारीही नागरिकांनी दर्शवली असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे..









